सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय: आमदार दीपक केसरकर

सावंतवाडी ( वार्ताहर ) :राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणारे नेतृत्व असून, हे दोघे एकत्र राहून राज्याच्या प्रगतीला सदैव प्राधान्य देतील, असा विश्वास माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा व प्रशासकीय अनुभवांचा आढावा घेतला. तसेच आगामी वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आमुलाग्र बदल घडवणारे आणि आर्थिक भरभराटीचे ठरेल, असा आशावाद व्यक्त करत जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आमचे मुख्य ध्येय असल्याचे स्पष्ट केले.

आमदार केसरकर यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मिळालेल्या गृह व अर्थ राज्यमंत्री यांसारख्या विविध मंत्रिपदांच्या माध्यमातून त्यांना जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. सिंधु रत्न योजना पुढे चालू ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली शिक्षण, मराठी भाषा मंत्री आणि मुंबई व कोल्हापूर पालकमंत्री पदाची जबाबदारी यामुळे ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणे शक्य झाले.

सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रकरणी उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली असून, राजघराण्याकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. यावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात आरोग्य व पायाभूत सुविधांची निर्मिती वेगाने सुरू असून, सावंतवाडी एस.टी. बस डेपो अत्याधुनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ते म्हणाले, शासकीय योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक विकासप्रकल्प राबवले जात आहेत. यामध्ये तिलारी येथील ॲम्युझमेंट पार्क, वॉटर स्पोर्ट्स, बोटींग प्रकल्प, वन्यप्राणी संवर्धन, मोती तलावातील बोटींग प्रकल्प, नरेंद्र डोंगरावरील योगा सेंटर आणि सावंतवाडी व आंबोली येथील रोप-वे सर्वेक्षणाचा समावेश आहे. या कामांत पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्य लाभत आहे.

याशिवाय आंबोली, चौकुळ व गेळे भागाचा पर्यटन विकास, आंबोली परिसरात गोल्फ कोर्स, फुकेरी घाट-हनुमंतगड-चौकुळ जोडणारा घाट रस्ता आणि सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यातील घाट जोडणाऱ्या रस्त्यांच्या विकासावर भर दिला जात आहे. संकेश्वर ते बांदा नॅशनल हायवे, शहरात अंडरग्राउंड पार्किंग आणि अंडरग्राउंड गटार व्यवस्था करून सावंतवाडी शहराचा कायापालट केला जाईल.

स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आंबा पिकावरील फळमाशी नियंत्रण, नारळापासून निरा व साखर निर्मिती, हळद लागवड, मधुमक्षिका पालन, ५० टक्के अनुदानावर पर्यटन घरकुल प्रकल्प, तसेच मच्छीमारांना बोटी व महिलांना गाड्यांचे वाटप यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी तिन्ही तालुक्यांत क्रीडांगणे उभारली जात आहेत.

दिल्लीतील ‘नीट’ (NEET) परीक्षेबाबत बोलताना ते म्हणाले की, कोचिंग क्लासेसचा धंदा आणि लोभ यामुळे पेपर फुटण्याचे प्रकार घडतात. यासाठी शैक्षणिक पद्धतीत आणि बारावीच्या परीक्षा पद्धतीत योग्य बदल घडवून आणणे गरजेचे आहे. मंत्रिपदाबाबत विचारले असता, आपण शिवसेनेत असून मंत्रीपदाबाबतचा निर्णय पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. पुन्हा संधी मिळाल्यास अधिक गतीने काम करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी गणेशोत्सवात रेल्वे प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत आमदार केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहराज्यमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला त्या पदावर कायम ठेवून शिवसेनेला अतिरिक्त कॅबिनेट मंत्री पद दिले होते, ही आठवण सांगत त्यांनी फडणवीस यांच्या सहकार्याचा उल्लेख केला. तसेच, अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले की, अजितदादा हे स्पष्टवक्ते, दूरदृष्टी असलेले आणि ‘बोले तैसा चाले’ असे नेतृत्व होते, ज्यांचा मोठा सहवास आपल्याला लाभला, असे ते म्हणाले.