दहा टक्के खर्चात सूक्ष्म सिंचन संच (ठिबक/तुषार संच) बसवा

 एस.सी, एस.टी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी मोहीम

चिपळूण (वार्ताहर) : राष्ट्रीय कृषी विकास योजना- प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) अंतर्गत २०२६-२७ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती (एस.सी) आणि अनुसूचित जमाती (एस.टी) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. कृषी आयुक्तांच्या आदेशानुसार ठिबक व तुषार सिंचनाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी १ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात येत आहे.
इच्छुक शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज सादर करावा. अर्ज भरताना सर्व माहिती अचूक नमूद करणे आवश्यक असून, चुकीची माहिती आढळल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करताना ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, ओळख पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे, बँक पासबुक आणि जातीचा दाखला असणे अनिवार्य आहे. या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के, तर इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान देण्यात येते. अनुदानाची कमाल मर्यादा ५ हेक्टर आहे. राज्य पुरस्कृत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक योजनेचा लाभ घेतलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना २५ टक्के, तर इतर शेतकऱ्यांना ३० टक्के पूरक अनुदान देण्यात येते. त्यामुळे त्यांना अनुक्रमे ८० टक्के व ७५ टक्के अनुदानाचा लाभ मिळतो.
याशिवाय अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून उर्वरित १० टक्के किंवा १५ टक्के अनुदान दिले जाते. त्यामुळे एस.सी व एस.टी प्रवर्गातील शेतकऱ्यांना एकूण ९० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळत असून, त्यांना केवळ १० टक्के खर्चात सूक्ष्म सिंचन संच – ठिबक किंवा तुषार संच बसविता येतो.अधिक माहितीसाठी किंवा ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील सीएससी केंद्र, सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात येत आहे.