लोकप्रतिनिधी, नगर परिषद व पोलीस प्रशासनाची यशस्वी भूमिका
बाजारात दिसून आला सुटसुटीपणा
शिवाजीपथ ते गणेशघाट व बंदरधक्का ते नवजीवन हायस्कुलपर्यंत एक बाजू पुर्णपणे मोकळी
वाहतुक कोंडीचा प्रश्न काही अंशी निकाली, व्यापारी, ग्राहकांना दिलासा
राजापूर प्रतिनिधी
शहरात गुरूवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराला शिस्त लावण्याच्या नगर परिषदेने घेतलेल्या निर्णयाला यश आले आहे. आठवडा बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी नगर परिषदेने निश्चित केलेल्या जागेवर गुरूवारी सर्व व्यापाऱ्यांना बसवत नगर परिषद व पोलीस प्रशासनाने शिवाजीपथ रस्त्यासह बंदरधक्याकडून पुढे नवजीवन हालस्कुलकडे जाणारा रस्ता एका बाजुला मोकाळा ठेवत गाडया पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था करत वाहतुक कोंडीवर चांगली उपाययोजना केली आहे. त्यामुळे गुरूवारी २३ जुलै रोजी भरलेल्या आठवडा बाजारात सुटसुटीतपणा दिसून आला. प्रशासनाच्या या भूमिकेचे नागरिक, व्यापारी, पादचारी व ग्राहकांनीही स्वागत केले आहे. तर व्यापाऱ्यांनी प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी व्यापाऱ्यांना धन्यवाद दिले आहे.
गुरूवारी सकाळी मुख्याधिकारी अभिजित कुंभार, राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांसह नगर परिषदेचे आरोग्य सभापती सुलतान ठाकूर, पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे, कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव यांसह नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांनी आठवडा बाजारात उपस्थित रहात थेट व्यापाऱ्यांशी संवाद साधत बाजारातील बैठक व्यवस्था व वाहतुकीचे अत्यंत चांगले नियोजन केले.
गेले काही दिवस राजापूर आठवडा बाजारातील बेशिस्त, काही व्यापाऱ्यांची मनमानी आणि शिवाजीपथ ते गणेशघाट रस्त्यावर आठवडा बाजाराच्या दिवशी होणारी वाहतुक कोंडी, यामुळे राजापुरचा आठवडा बाजार चांगलाच चर्चेत आला होता. यावर नगर परिषद प्रशासनाने आठवडा बाजाराच्या दिवशी शिवाजीपथ ते गणेशघाट रस्त्यावर बसण्याऱ्या व्यापाऱ्यांना बसण्यास प्रतिबंध केला होता. याला काही व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. मात्र सोमवारी 20 जुलै रोजी झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांनी व्यापाऱ्यांच्या मागणीचा विचार करत तात्पुरत्या स्वरूपात गणेशघाट ते शिवाजीपथ रस्त्यावर कोळवणकर घराच्या मागील रॅम्प पर्यंत एका बाजुला बसण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला होता. मात्र एक शिवाजीपथ ते गणेशघाट व पुढे नवजीवन हायस्कुलपर्यंत बाजू पुर्णपणे नो पाकिंग झोन करून व्यापाऱ्यांना गाडया लावण्यासाठी अन्य ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. याची अंमलबजावणी गुरूवारी २३ जुलै रोजी होणाऱ्या बाजारापासून करण्याचे निश्चित करण्यात आले.
त्याप्रमाणे गुरूवारी मुख्याधिकारी अभिजित कुंभार व राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी आपल्या सहकारी पथकांसह सकाळी ६.३० वाजताच बाजारात उपस्थित रहात सुयोग्य असे नियोजन केले. गणेशघाट ते शिवाजीपथ रस्त्यावर कोळवणकर घराच्या मागील रॅम्प पर्यंत एका बाजुला बसण्यासाठी जागा देण्यात आली. तर संपुर्ण आठवडा बाजारात फिरून ज्या व्यापाऱ्यांनी, भाजी विक्रेते व अन्य विक्रेत्यांनी भुईभाडे भरतात त्यापेक्षाही अधिक जागा व्यापाली होती त्यांना योग्य प्रकारे जागा निश्चित करून देत उर्वरित जागेत जे व्यापारी बाहेर रस्त्यावर बसले होते त्यांना बसवून बाजारात सुटसुटीपणा आणला. तर व्यापाऱ्यांना गाडया पार्किंगसाठी नवजीवन हायस्कुलच्या एका बाजुचा भाग तसेच वरच्या पेठेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजुला गाडया लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे एक बाजु चांगली मोकळी राहिल्याने व्यापारी, नागरिक, पादचारी व वाहन चालकांनाही गुरूवारी दिलासा मिळाळा.
नगर परिषद व पोलीस प्रशासनाने गुरूवारी अत्यंत चांगल्या प्रकारे व्यापाऱ्यांशी संवाद साधून आठवडा बाजाराचे नियोजन करत बाजारात सुसुत्रिकरण आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे नागरिक, व्यापारी, ग्राहक व वाहनचालकांडूनही त्याचे स्वागत करण्यात आले आहे. तर मुख्याधिकारी अभिजित कुंभार व राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी व्यापारी, ग्राहक व वाहन चालकांनी प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले आहेत.
याप्रसंगी शिवसेना गटनेते एड. राहुल तांबे, नगरसेवक सिध्दांत जाधव, दीलीप चव्हाण, प्रेरणा नार्वेकर, उर्मिला बाकाळकर, साजिया काझी, सान्वी रावण, बांधकाम विभागाचे रणविर देसाई, आरोग्य विभागाचे प्रमुख अमित पवार, योगेश बंडगर, मुकादम राजन जाधव आदींसह नगर परिषदेच्या विविध विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.










