चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे संस्थेच्या माजी अध्यक्षा स्वर्गीय अनुराधाताई निकम यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. शिक्षण, समाजसेवा, नेतृत्व, शिस्त आणि जनसेवा या मूल्यांचा विद्यार्थ्यांमध्ये जागर निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांच्या हस्ते स्वर्गीय अनुराधाताई निकम व स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी दोन्ही मान्यवरांना आदरांजली अर्पण केली. विद्यार्थी मनोगताच्या सत्रात इयत्ता सहावी ‘ब’ मधील रेहा राजेशिर्के व इयत्ता दहावी ‘ब’ मधील दीप्ती लिबे यांनी स्वर्गीय अनुराधाताई निकम यांच्या शिक्षण क्षेत्रातील मोलाच्या कार्याचा आढावा घेतला. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या उभारणी व विस्तारात त्यांनी दिलेले योगदान, विद्यार्थ्यांविषयी असलेली आत्मीयता, शिक्षणाबद्दलची तळमळ आणि समाजाभिमुख दृष्टीकोन यांची माहिती त्यांनी प्रभावी शब्दांत मांडली. त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव जपावी, असे आवाहनही त्यांनी केले. त्यानंतर इयत्ता दहावी ‘ब’ मधील स्वरा टक्के व इयत्ता दहावी ‘क’ मधील साक्षी गोरे यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा परिचय करून दिला. राज्याच्या विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, प्रशासनातील कार्यक्षमता, लोकाभिमुख निर्णयक्षमता, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता यांचा उल्लेख करत त्यांच्या नेतृत्वगुणांवर प्रकाश टाकला. विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
शिक्षक मनोगतात सहाय्यक शिक्षिका वैभवी भुवड यांनी स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांनी उभारलेल्या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या विकासात स्वर्गीय अनुराधाताई निकम यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. संस्थेतील प्रत्येक शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांप्रती त्यांचे असलेले प्रेम, शैक्षणिक गुणवत्तेबाबतची त्यांची बांधिलकी, शिस्तप्रियता आणि सेवाभाव यांमुळे त्या सर्वांच्या कायम स्मरणात राहतील, असे त्यांनी नमूद केले. यानंतर विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक रोहित गमरे यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या व्यक्तिमत्त्वातील वक्तशीरपणा, प्रशासनातील निर्णयक्षमता, लोकांच्या अडी-अडचणी तत्परतेने सोडविण्याची वृत्ती आणि सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी यांचा उल्लेख केला. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव दीर्घकाळ जाणवत राहील, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी स्वर्गीय अनुराधाताई निकम यांच्या शिक्षणसेवेचे स्मरण करून त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी समर्पण, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेची प्रेरणा घ्यावी, असे सांगितले. तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करत शिस्त, कर्तव्यदक्षता आणि समाजहिताची भावना या प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात जोपासणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. मंत्रालयापासून ते ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांपर्यंत विकासाची दृष्टी पोहोचविणाऱ्या नेतृत्वाचे विचार आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या आकर्षक भित्तिपत्रकाचे उद्घाटन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक अशोक शितोळे व दादासाहेब पांढरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सहाय्यक शिक्षक जयंत काकडे यांनी स्वर्गीय अनुराधाताई निकम व स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जीवनकार्यावर आधारित माहितीपूर्ण व्हिडिओ क्लिप सादर केली. या दृकश्राव्य सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी परिचय झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा कदम यांनी केले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक विजय चव्हाण, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता दादासाहेब पांढरे यांनी उपस्थितांचे आभार मानून केली. स्वर्गीय अनुराधाताई निकम यांच्या शिक्षणसेवेचा आदर्श आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाचा प्रेरणादायी वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या या कार्यक्रमामुळे विद्यालय परिसरात कृतज्ञता, प्रेरणा आणि राष्ट्रसेवेची भावना अधिक दृढ झाली.











