जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे होणार सहभागी
आंबोली : प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली घाट परिसरात स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने रविवार, दि. २६ जुलै रोजी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वच्छता मिशन, सिंधुदुर्ग’ आणि ग्रामपंचायत आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवली जाणार असून, रविवारी सकाळी ९:३० वाजता ‘पूर्वीचा वस’ या ठिकाणी ही मोहीम पार पडणार आहे.
या स्वच्छता उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत. आंबोली ग्रामपंचायतीच्या प्रशासक व माजी सरपंच श्रीमती सावित्री पालेकर यांच्या सहकार्याने या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.
पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करत असतानाच परिसराची स्वच्छता राखणे आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचा संदेश देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमात आंबोली टुरिझम आणि आंबोली पर्यटन व्यावसायिक महासंघ देखील सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती या स्वच्छता मोहिमेत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जि. प. सदस्या शोभा गावडे, तहसीलदार श्रीधर पाटील, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, वन परीक्षेत्र अधिकारी वैभव भिसे, पंचायत समिती सदस्य मायकेल डिसोजा, गटविकास अधिकारी निलेश जाधव, गेळे गावचे सरपंच सागर ढोकरे आणि चौकुळचे प्रशासक व माजी सरपंच गुलाबराव गावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
‘पर्यटकांचे स्वागत करूया, कचरा रोखूया’ ‘पर्यटकांचे स्वागत करूया, पण कचरा न फेकण्याचे आवाहन करूया’ या सूत्राधारे आंबोलीचे निसर्गसौंदर्य आणि स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हाभरातील सर्व स्वच्छताप्रेमींनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वच्छता मिशनचे निमंत्रक व पत्रकार गणेश जेठे यांनी केले आहे.













