सावर्डे तर्फे असंडोली येथील युवा उद्योजक भिकाजी काळे यांच्या प्रज्ञा पोल्ट्री फार्मवर संकट; ५ हजार पक्ष्यांच्या शेडमध्ये पाणी शिरून शेकडो पक्ष्यांचा मृत्यू, शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा
प्रतापसिंह काळे
पन्हाळा प्रतिनिधी
सावर्डे तर्फे असंडोली :
कष्टाने उभं केलेलं आयुष्य एका क्षणात कोसळतं, तेव्हा फक्त आर्थिक नुकसान होत नाही; तर माणसाच्या स्वप्नांचाही अंत्यसंस्कार होत असतो.सावर्डे तर्फे असंडोली येथील युवा उद्योजक भिकाजी बाबुराव काळे यांची कहाणी अशीच मन हेलावून टाकणारी आहे.
बी.कॉम.ची पदवी घेतल्यानंतर मोठी नोकरी मिळाली नाही म्हणून त्यांनी नशिबाला दोष दिला नाही. हातात पदवी होती; पण पोटासाठी त्यांनी सेंट्रींगची कामे केली. लोखंड, सिमेंट आणि उन्हाच्या चटक्यात घाम गाळत त्यांनी दहा जणांच्या कुटुंबाचा संसार उभा केला. त्या कष्टाच्या भांडवलावर त्यांनी सांगरुळ येथील एका शेतकऱ्याच्या शेतजमिनीत भाडेतत्त्वावर सुमारे पाच हजार पक्ष्यांची क्षमता असलेले शेड उभारून “प्रज्ञा पोल्ट्री फार्म” सुरू केला.हा व्यवसाय त्यांच्यासाठी केवळ उत्पन्नाचा मार्ग नव्हता; तो त्यांच्या कष्टांचा, आशांचा आणि भविष्याच्या स्वप्नांचा आधार होता. ज्या पिल्लांना अजून पंखही फुटले नव्हते, त्यांना त्यांनी लेकरांसारखे जपले. दिवस-रात्र जागून खाद्य-पाणी दिले, औषधोपचार केले, प्रत्येक पक्षी निरोगी वाढावा म्हणून स्वतःच्या सुखाचा त्याग केला.
परंतु निसर्गाने एका रात्रीत सगळेच गणित बदलून टाकले.
मुसळधार पावसामुळे पोल्ट्री शेडमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. जीव वाचविण्यासाठी धावपळ सुरू असतानाच पाण्याच्या विळख्यात सुमारे ४०० ते ५०० पक्ष्यांचा मृत्यू झाला. कालपर्यंत किलबिलाटाने गजबजलेले शेड आज भयाण शांततेत उभे आहे. मृत पक्ष्यांचे ढीग आणि त्यांच्याकडे हतबल नजरेने पाहणारे भिकाजी काळे… हे दृश्य कोणाच्याही मनाला चटका लावणारे आहे.
या घटनेने केवळ पक्ष्यांचे प्राण गेले नाहीत, तर एका कष्टकरी उद्योजकाची आर्थिक घडीही विस्कटली आहे. अनेक महिन्यांच्या अहोरात्र परिश्रमावर एका पावसाने पाणी फेरले आहे.भिकाजी काळे यांची ओळख फक्त उद्योजक म्हणून नाही. परिसरात कुणाचा अपघात झाला, एखाद्या कुटुंबावर संकट आले किंवा कोणाला मदतीची गरज भासली, तर सर्वप्रथम धाव घेणाऱ्या माणसांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. दुसऱ्यांच्या दुःखात खंबीरपणे उभे राहणारा हा माणूस आज स्वतःच्या दुःखासमोर असहाय्य उभा आहे.
आज गरज आहे ती केवळ सहानुभूतीची नाही, तर शासनाच्या तातडीच्या कृतीची. संबंधित यंत्रणांनी त्वरित पंचनामा करून वस्तुनिष्ठ नुकसानभरपाई जाहीर करावी. अशा कष्टकरी उद्योजकांना पुन्हा उभे राहण्यासाठी आर्थिक आधार देणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून समाजाप्रती असलेली नैतिक बांधिलकी आहे.कारण…पाऊस हा निसर्गाचा आशीर्वाद असतो; पण तोच जेव्हा कष्टकरी माणसाच्या घरात दुःख बनून उतरतो, तेव्हा तो फक्त पक्ष्यांचे प्राण घेत नाही… तो एका कुटुंबाची स्वप्ने, आशा आणि भविष्यही वाहून नेतो. ज्या हातांनी हजारो पक्ष्यांना जीव दिला, तेच हात आज मदतीच्या अपेक्षेने शासनाकडे पाहत आहेत. त्या हातांना आधार देणे, हीच खरी माणुसकी ठरेल.













