कल्पना कॉलेज च्या रानभाज्या पाककला स्पर्धेत आदिती केळकर प्रथम

स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांपासून तयार केले आकर्षक व स्वादिष्ट पदार्थ

लांजा (प्रतिनिधी) कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, लांजा येथे झालेल्या रानभाज्या पाककला स्पर्धेत आदिती केळकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. तीने कुर्डू सूप हा पदार्थ तयार केला होता.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, लांजा येथे हॉटेल मॅनेजमेंट विभागामार्फत रानभाज्या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, पारंपरिक रानभाज्यांची ओळख करून देणे, त्यांचे पौष्टिक व औषधी गुणधर्म समजावून सांगणे तसेच भविष्यातील खाद्यसंस्कृतीमध्ये रानभाज्यांचे वाढते महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा होता.
या स्पर्धेत एकूण २४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध रानभाज्यांपासून आकर्षक व स्वादिष्ट पदार्थ तयार केले. प्रथम क्रमांक – आदिती केळकर (कुर्डू सूप). द्वितीय क्रमांक – कुणाल चव्हाण (भारंगी कटलेट), तृतीय क्रमांक – रोशनी शिंदे (सुरण कटलेट), चतुर्थ क्रमांक – स्मित जाधव (टाकळ्याची भाजी)
याशिवाय विद्यार्थ्यांनी टाकळ्याची भाजी, टाकळ्याचे कटलेट, कुर्डूवडी, मायाळू भजी, रोवण भाजी, टाकळ्याचा पराठा, आकुर भाजी, टाकळ्याचा समोसा अशा विविध पारंपरिक व नाविन्यपूर्ण पदार्थांची आकर्षक मांडणी केली होती. स्पर्धेचे परीक्षण ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. श्रीम. कुंभार , प्रा. श्रीम पाटील तसेच किचन विभागाचे प्रा. चंदन कातळकर यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मंगेश चव्हाण, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.