चिमुकल्यांच्या पावलांनी जिवंत झाली वारकरी परंपरा;सावर्डेत संस्कारांची भक्तिमय दिंडी

 

*प्रतापसिंह काळे* 

पन्हाळा l प्रतिनिधी :संत परंपरेचे विचार केवळ पुस्तकांत न राहता ते बालमनात रुजावेत, वारकरी संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा आणि समाजात भक्तीबरोबरच संस्कारांची बीजे पेरली जावीत, या उद्देशाने विद्या मंदिर सावर्डे तर्फे असंडोली येथे आषाढी एकादशी निमित्त संस्कारमय दिंडी उत्साहात काढण्यात आली. सकाळी ८.३० वाजता सुरू झालेल्या या दिंडीत अंगणवाडी व शाळेतील ९५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

 

भगतसिंह वाचनालयापासून प्रारंभ झालेली दिंडी बच्चे गल्ली, मंडप गल्ली, जोतिबा देवळामागील गल्ली तसेच मागासवर्गीय गल्ली मार्गे गावभर फिरली. संत ज्ञानेश्वर, विठ्ठल-रखुमाई यांची वेशभूषा साकारलेल्या चिमुकल्यांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग, हरिनाम आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.मार्गात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. ग्रामस्थांनी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करत राजगिरा लाडू, साबुदाणा चिवडा आणि केळीचे वाटप केले. त्यामुळे दिंडीला सामाजिक ऐक्याचीही सुंदर जोड मिळाली.

 

या उपक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक संजय हेरेकर निर्मला गोडे सविता मायाण्णा रामेश्वर राठोड या शिक्षकांनी केले. सरपंच संभाजी कापडे, सदस्य शिल्पा बच्चे, पालकवर्ग, अंगणवाडी सेविका राणी सातपुते, कविता सातपुते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

*विद्यार्थ्याची प्रतिक्रिया*

श्रीवर्धन मानसिंग मोरे

(इयत्ता ७ वी) म्हणाला, “दिंडीत सहभागी झाल्यानंतर संतांचे विचार आणि वारकरी परंपरेचे महत्त्व अधिक जवळून समजले. अशा उपक्रमांमुळे शिस्त, संस्कार आणि समाजाशी जोडले जाण्याची प्रेरणा मिळते.”