उत्कृष्ट कामाबाबत समितीकडून ग्रामपंचायत चे कौतुक
वेंगुर्ले : प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत अणसूर येथे विभागस्तरीय मूल्यांकनासाठी अमरावतीहून आलेल्या विशेष विभागीय समितीने नुकतीच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. अमरावती विभागीय आयुक्त तथा समिती अध्यक्षा नयना गुंडे यांच्या उपस्थितीत समितीने ग्रामपंचायतीच्या उत्कृष्ट कारभाराची, विकासकामांची आणि राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सखोल तपासणी केली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या विभागस्तरावरील क्रमांकासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अणसूर व कळसुली कार्यक्षेत्र – नगर या दोन ग्रामपंचायती जिल्ह्यात अग्रस्थानावर आल्या असून पुढील कोकण विभागीय मूल्यांकनासाठी अमरावतीहून आलेल्या विभागीय समितीने ग्रामपंचायत अणसूरचे मूल्यापन केले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने समितीचे अत्यंत उत्साहात आणि जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी अणसूर-पाळ हायस्कूल अणसूर, जि. प. प्राथमिक शाळा अणसूर, अंगणवाडी अणसूर, ग्रामपंचायत तसेच विविध कामांची पाहणी केली व बचत गटांच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी समिती अध्यक्षा तथा अमरावती विभागीय आयुक्त नयना गुंडे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी रजनी धोंडगीमसे, अमरावती अपर आयुक्त शालिनी कडू, सहाय्यक आयुक्त जजेरा फडके, सिंधुदुर्ग अति. मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड-कवडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब आदी समिती सदस्य उपस्थित होते. तसेच वेंगुर्ले पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) प्रमोद तळे, विस्तार अधिकारी (पंचायत) किशोर पांडे, वेंगुर्ले पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, ग्रामपंचायत सदस्य सयमी गावडे, प्रज्ञा गावडे, साक्षी गावडे, वामन गावडे, सीमा गावडे आणि सुधाकर गावडे, अणसूर हायस्कूल मुख्याध्यापक राजेश घाटवळ, विभागीय समन्वयक अमोल पडवळ, ग्रामपंचायत कर्मचारी सुप्रिया गावडे, सोनू गावडे यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत व सन्मान करण्यात आला.
यावेळी अणसूर पाल हायस्कूलचे सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी तसेच आरोग्य अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविका, स्थानिक बचत गटातील महिला, सीआरपी, गावातील तरुण मंडळ आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
मूल्यापन समितीने ग्रामपंचायतीची प्रशासकीय दप्तर तपासणी, जमा-खर्च अभिलेख, स्वच्छता अभियान, पाणीपुरवठा योजना, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, तसेच महिला सक्षमीकरण व नाविन्यपूर्ण उपक्रमांची बारकाईने पाहणी केली. सर्व क्षेत्रांतील ग्रामस्थांचा, महिलांचा आणि तरुण मंडळाचा सहभाग पाहून समितीने विशेष कौतुक केले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पंचायत राज व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी अणसूर ग्रामपंचायतीने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे मत मूल्यापन समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले.












