राजापूर (वार्ताहर): आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर शनिवारी राजापूर शहरात भक्तीचा पूर आल्याचे पाहायला मिळाले. शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या श्री विष्णू पंचायतन विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी उत्सव अत्यंत पारंपारिक आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. विठू नामाचा गजर, आणि शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या शिस्तबद्ध दिंड्या यामुळे संपूर्ण राजापूर शहर विठ्ठलमय झाले होते.
सकाळपासूनच राजापूर शहर आणि परिसरातील शेकडो विठ्ठलभक्तांनी देवाच्या दर्शनासाठी मंदिरात रांगा लावल्या होत्या. मंदिर प्रशासनाकडून भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती.
शालेय बाल वारकऱ्यांचा अभूतपूर्व उत्साह
उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते राजापूर शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी काढलेली भव्य आणि नयनरम्य दिंडी. यामध्ये राजापूर हायस्कूल, विश्वनाथ विद्यालय, गोखले कन्याशाळा, जिल्हा परिषद शाळा गुजराळी, आरएसपीएम इंग्लिश मिडियम स्कूल, आंबेवाडी या सर्व शाळांमधील शेकडो मुला-मुलींनी पारंपारिक वारकरी वेशभूषा परिधान केली होती. मुलांच्या खांद्यावर फडकणारी भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी आणि हातातील टाळांच्या तालावर ‘ज्ञानबा-तुकाराम’ व ‘विठ्ठल विठ्ठल’ असा गजर करत या दिंड्या शाळांपासून ते श्री विठ्ठल मंदिरापर्यंत सवाद्य काढण्यात आल्या.
विठ्ठल-रखुमाईच्या रूपाने वेधले लक्ष
या बाल वारकऱ्यांच्या भक्तीमय जलोषाने राजापूरच्या मुख्य बाजारपेठेतील वातावरण काही काळासाठी पूर्णपणे गजबजून आणि भक्तीरसात न्हाऊन निघाले होते. दिंडीमध्ये अनेक लहान मुलांनी विठ्ठल आणि रखुमाईची तसेच संत, वारकऱ्यांची हुबेहूब वेषभूषा केली होती. मंदिरात बाल वारकऱ्यांचा मेळा अत्यंत शिस्तबद्ध रितीने मार्गक्रमण करत या सर्व दिंड्या ऐतिहासिक श्री विष्णू पंचायतन विठ्ठल मंदिरात पोहोचल्या. मंदिरात आगमन झाल्यावर मंदिर व्यवस्थापन समिती आणि विश्वस्तांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. बाल वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे मंदिराच्या गाभाऱ्यात आणि प्रांगणात जणू लहानग्या वारकऱ्यांचा महामेळाच भरल्याचा भास होत होता.
आषाढी एकादशीचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व सामाजिक मूल्ये रुजविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनातील भक्तीभाव, संस्कार आणि भारतीय संस्कृतीबद्दलची जागरूकता अधिक दृढ झाली. या दिंडयांमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक मोठया संख्येने सहभागी झाले होते.
Home महत्वाच्या बातम्या बाल वारकऱ्यांच्या दिंडीनी दुमदुमले राजापूर, पारंपारिक वेष भुषा करत वेधले लक्ष












