सावंतवाडी l प्रतिनिधी : गेली पाच वर्षे सातत्याने ‘ऑडिट अ’ वर्गाचा दर्जा कायम राखणाऱ्या श्री संत रोहिदास सहकारी पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सावंतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहात उत्साहात पार पडली. यावेळी भावी पिढीच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा संस्थेचा निर्धार असल्याचे अध्यक्ष गोविंद बाळा वाडकर यांनी स्पष्ट केले. तसेच संचालक मंडळातील कोणत्याही नातेवाईकाला कर्ज दिले जात नसल्याचे सांगत संस्थेच्या पारदर्शक कारभारावर त्यांनी भर दिला.
सभेच्या प्रारंभी सातार्डा येथील माजी सैनिक चंद्रकांत पवार, त्यांच्या पत्नी चंद्रावती पवार तसेच संस्थेचे दिवंगत सभासद व नातेवाईकांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त, ताळेबंद, तेरीजपत्रक आणि नफा-तोटा पत्रक वाचून सभागृहाने त्यास मंजुरी दिली. अंदाजपत्रकापेक्षा कमी-अधिक झालेल्या खर्चालाही सभेने मान्यता दिली.
केंद्र सरकारच्या सहकार खात्याच्या निर्देशानुसार संस्थेची हिशोब तपासणी पूर्ण झाली असून, सलग तिसऱ्या वर्षी लेखापाल व्ही. बी. शिरोडकर यांची नियुक्ती कायम ठेवण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच सुधारित आदर्श उपविधीलाही सभेची मंजुरी मिळाली.
अध्यक्ष गोविंद वाडकर यांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात संस्थेला ३ लाख ८३ हजार ३६८ रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती दिली. तसेच लवकरच सावंतवाडी शहरात पतसंस्थेचे सुसज्ज कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
सभेत २००३ पासून संस्थेला अविरत सेवा देणारे व्यवस्थापक सदानंद चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. संचालक परशुराम चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पतसंस्थांमध्ये होत असलेल्या बदलांविषयी बोलताना अध्यक्ष वाडकर म्हणाले की, सहकारी बँकांप्रमाणेच आता पतसंस्थांनाही रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीची अंमलबजावणी होत असून केंद्रीय सहकारी कायद्यानुसार संस्थेचे लेखापरीक्षण झाले आहे. त्यामुळे पतसंस्थेचा आर्थिक पाया अधिक भक्कम झाला असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सभेला उपाध्यक्ष बाबुराव चव्हाण, संचालक परशुराम चव्हाण, मंगेश कदम, संगीता वाडकर, सुलोचना वाडकर, मनोहर वेंगुर्लेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय चव्हाण, नरेश कारीवडेकर, दशरथ वाडकर, पिग्मी प्रतिनिधी नारायण केसरकर यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक सदानंद चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन अध्यक्ष गोविंद वाडकर यांनी केले.











