सावंतवाडी| प्रतिनिधी: आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावंतवाडी शहरातील अंगणवाडी क्रमांक १५ मधील चिमुकल्यांनी पारंपरिक वेशभूषेत उत्स्फूर्त पायी वारी काढत वारकरी परंपरेचा अनोखा अनुभव घेतला. उभाबाजार ते सालईवाडा येथील ऐतिहासिक संस्थानकालीन विठ्ठल-रखुमाई मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या या वारीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ-मृदुंग आणि मुखी ‘विठ्ठल… विठ्ठल…’चा अखंड गजर करत निघालेल्या या बालवारकऱ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. चिमुकला स्वराज गोरे याने विठ्ठलाची, तर श्रिशा देशमुख हिने रखुमाईची आकर्षक वेशभूषा साकारली होती. पालखीचे भोई बनण्याचा मान दुर्वाश जाधव आणि समर्थ नेवगी यांनी भूषवला.
या भक्तिमय सोहळ्यात गितांश मुंज, नियात, शब्दाली कदम, रुद्राली बेळगावकर, अलिषा दापले, दुर्वा नाईक, अर्पिता कडगावकर, दक्षायनी, नितेश चव्हाण, हितेश बांदेकर, लकी शर्मा, दुर्वा कोरगावकर, वीरा रेडकर, रसिका गोरे, मल्हार लाखे, श्रुती गावडे आणि मोक्षतारी या चिमुकल्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभाग घेत उपस्थितांची मने जिंकली.
या पायी वारीचे नियोजन अंगणवाडी सेविका अनुराधा पवार आणि मदतनीस अमिषा सासोलकर यांनी केले. पालक श्रेया नेवगी, ज्योती कदम, आरती दापले, आर्या मुंज, अवंतिका गोरे आणि दिलीप देशमुखे यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषात निघालेली ही बालवारी विठ्ठल-रखुमाई मंदिरात पोहोचल्यानंतर दर्शन घेऊन सांगता झाली.












