सावंतवाडी | प्रतिनिधी : वाढदिवस केवळ वैयक्तिक आनंदापुरता न साजरा करता समाजातील गरजू घटकांसोबत साजरा करण्याचा आदर्श दयासागर फाउंडेशन, सावंतवाडीचे सदस्य लक्ष्मण गुरुनाथ लमानी यांनी घालून दिला. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शेरवड येथील मयेकरवाडी (डोबाचीशेळ) येथील असिसी आश्रमाला भेट देत तेथील बौद्धिक दिव्यांग मुलींसमवेत केक कापून वाढदिवस साजरा केला. तसेच सर्व मुलींना गोड पदार्थ व खाऊचे वाटप करून आनंद द्विगुणित केला.
दयासागर फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असून, त्यांच्या या कार्याला जिल्हाभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. लक्ष्मण लमानी यांच्या या उपक्रमामुळे आश्रमातील मुलींच्या चेहऱ्यावर आनंद फुलल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी बोलताना लक्ष्मण लमानी म्हणाले, “वाढदिवसानिमित्त मिळणाऱ्या शुभेच्छांपेक्षा या मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मिळणारे समाधान अधिक मोठे आहे. आपल्याकडे जे आहे त्यातील थोडे इतरांसोबत वाटल्याने आनंद अनेकपटीने वाढतो.”
या सामाजिक उपक्रमात दयासागर फाउंडेशनचे खजिनदार ऋषिकेश नाईक, सदस्य विनीता साळगावकर, मायकल फर्नांडिस, सोनाली फर्नांडिस, पांडुरंग कुंभार, शकुंतला कुंभार, शांता नाईक यांच्यासह फाउंडेशनचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आश्रमाच्या वतीने संस्थेच्या प्रमुखांनी दयासागर फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे आभार मानत, अशा समाजोपयोगी उपक्रमांचे सहकार्य भविष्यातही कायम राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
छायाचित्र -शेरवड येथील असिसी आश्रमातील बौद्धिक दिव्यांग मुलींसमवेत केक कापून वाढदिवस साजरा करताना दयासागर फाउंडेशनचे सदस्य लक्ष्मण लमानी व अन्य पदाधिकारी.













