सावंतवाडी |प्रतिनिधी : सावंतवाडी-कुडाळ महामार्गावरील कोलगाव येथील मियासाब दर्ग्याजवळ दुचाकी आणि स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तरुण-तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत आयुषी देसाई यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या कार्तिक परब यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी (क्रमांक GA 03 AB 7501) कुडाळच्या दिशेने जात असताना सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कार (क्रमांक MH 07 AG 7801)शी कोलगाव येथील मियासाब दर्ग्याजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. आयुषी देसाई यांचा जागीच मृत्यू झाला, तर कार्तिक परब गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्विफ्ट कार रस्त्यालगतच्या गटारात जाऊन आदळली असून तिच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
घटनेनंतर स्थानिक नागरिक महेश बांदेकर, कृष्णा धुळपनावर आणि लादू रायका यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले; मात्र कार्तिक परब यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातानंतर स्विफ्ट कारच्या चालकाबाबत अद्याप माहिती समोर आलेली नसून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार राऊत, पोलीस हवालदार सुरेश पाटील, पोलीस हवालदार धोत्रे आणि पोलीस कॉन्स्टेबल पवन परब करत आहेत.












