रत्नागिरीत दामले शाळेत चिमुकल्यांचा ‘वारी’ सोहळा उत्साहात;

रत्नागिरी:
रत्नागिरी शहरातील दामले शाळेच्या अंगणवाडी व बालवाडी विभागात आषाढी एकादशीनिमित्त छोट्या मुलांसाठी वारीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून चिमुकल्या बालगोपाळांना प्रत्यक्ष वारीचा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी संप्रदायाचा अनोखा अनुभव घेता आला.
​शाळेचा परिसर विठ्ठल विठ्ठल आणि ज्ञानबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. कार्यक्रमासाठी सर्व लहान मुले पारंपरिक पोशाखात सज्ज होऊन आली होती. बालवाडीतील मुलांनी परिधान केलेले धोतर, कुडता, डोक्यावर तुळशीचे वृंदावन, हातात टाळ आणि कपाळावर गोपीचंदन, तर मुलींनी नेसलेली छोटी नऊवारी साडी आणि हातात घेतलेली तुळस यांमुळे संपूर्ण शाळा परिसर जणू प्रति-पंढरपूरच बनला होता.
चिमुकल्यांच्या नाजूक हातांतून वाजणाऱ्या
टाळांमुळे त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहण्यासारखा होता. शिक्षिकांनी मुलांना या वेळी रिंगण सोहळा कसा असतो, वारीचे महत्त्व काय असते, याबद्दल सोप्या भाषेत माहिती दिली.
कार्यक्रमात काही लहान मुलांनी विठ्ठल व रुक्मिणीची रूपे साकारली होती. सर्व मुलांनी नतमस्तक होऊन या ‘चिमुकल्या विठुरायाचे’ दर्शन घेतले. वारीच्या अनुभवानंतर सर्व लहान मुलांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
लहान वयातच मुलांवर चांगले संस्कार व्हावेत आणि आपल्या संस्कृतीची व परंपरांची ओळख व्हावी, हा या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश होता. मुलांनी केवळ पुस्तकात वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष वारी अनुभवल्यामुळे त्यांच्यात कमालीचा उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला.”
​पालकांनीही शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून आपल्या मुलांना संस्कृतीशी जोडणाऱ्या अशा उपक्रमांमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, अशी भावना व्यक्त केली. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाने आणि भक्तीमय वातावरणाने हा वारीचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.