रत्नागिरी : सप्तसूर फाऊंडेशन, रत्नागिरी आणि अखिल चित्पावन विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अभंगवाणी’ या उपक्रमाच्या १२ व्या वर्षातील महिला विशेष कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २५ जुलै रोजी आयोजित संस्थेच्या भगवान परशुराम सभागृह रत्नागिरी येथे झालेल्या या कार्यक्रमात अभंग, भक्तिगीते आणि निरूपणाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर कार्यक्रमाचे प्रायोजक तसेच कलाकारांचे स्वागत मंडळाचे पदाधिकारी श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात “जय जय रामकृष्ण हरी” या गजराने झाली. त्यानंतर गायिका सावनी नाटेकर यांनी “अवघाची संसार” आणि “झाला महार पंढरीनाथ” हे अभंग सादर करून भक्तिरसाची सुरेख सुरुवात केली. वैष्णवी जोशी यांनी “सुखाचे जे सुख” आणि “हरिभजना वीण काळ” या अभंगांद्वारे वातावरण अधिक भक्तिमय केले. तर सावनी शेवडे-भडसावळे यांनी “आकल्प आयुष्य” आणि “श्रीरंगा कमलाकांता” ही बहारदार भक्तिगीते सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.
गायिकांना तबल्यावर गायत्री पाध्ये, पखवाजावर मीरा पांचाळ, ऑर्गनवर प्राची निमकर-रानडे यांनी उत्कृष्ट साथ दिली. कार्यक्रमाचे निरूपण आणि तालवाद्याची जबाबदारी स्पृहा चक्रदेव यांनी समर्थपणे सांभाळली. एस. कुमार साऊंड सर्व्हिसेस, रत्नागिरी यांनी ध्वनी संयोजनाची प्रभावी जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रम जसजसा पुढे सरकत गेला तसतशी त्याची रंगत अधिक खुलत गेली. महिला विशेष या संकल्पनेला साजेसा भक्तिरस, सुरेल सादरीकरण आणि वाद्यसाथ यामुळे संपूर्ण सभागृह भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. प्रत्येक सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
या कार्यक्रमासाठी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, रत्नागिरी यांनी प्रायोजक म्हणून तर अनबॉक्स सर्व्हिसेस, रत्नागिरी यांनी फूड पार्टनर म्हणून सहकार्य केले.
‘अभंगवाणी’ उपक्रमाची यशस्वी १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सप्तसूर फाऊंडेशनचे श्री. निरंजन गोडबोले यांनी आजपर्यंत सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था, प्रायोजक, कलाकार, पत्रकार बंधू,स्वयंसेवक आणि रसिकांचे मनःपूर्वक आभार मानले.












