लांजा (प्रतिनिधी) : शहरातील किलबिल प्ले स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील चिमुकल्यांनी पंढरपूरच्या वारीचा देखावा साकारत उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हातात तुळस, टाळ, मृदुंग घेऊन वारकऱ्यांचा वेश परिधान केला होता. तर काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाईची आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोठ्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची दिंडी काढत पंढरपूरच्या वारीचा आनंददायी अनुभव शाळेतच उभा केला.मुलांनी पांढरा सदरा, धोतर आणि गांधी टोपी, तर मुलींनी नऊवारी साडी परिधान करून पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवले. संपूर्ण परिसर “विठ्ठल… विठ्ठल…”च्या जयघोषाने भक्तिमय झाला होता.
या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया शिगम यांनी उत्कृष्टरीत्या केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगत पंढरपूरच्या वारीचा अनुभव शाळेतच निर्माण केला.
विद्यार्थ्यांच्या पालकांनीही आपल्या पाल्यांना सुंदर पारंपरिक वेशभूषेत सजवून कार्यक्रमाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका सुप्रिया शिगम यांनी सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. उत्साह, भक्ती आणि संस्कारांचा सुंदर संगम घडविणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.











