देवरूख (प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील सर्व १४७ गावांतील नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित कामे सहजासहजी करता यावीत, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शासकीय कामांसाठी होणारी पायपीट थांबवून विविध दाखले व योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार, दि. २८ जुलै रोजी सायंकाळी ४:०० वाजता चिपळूण येथील ‘कर्मवीर भाऊराव पाटील सभागृह’ (डीबीजे महाविद्यालय परिसर) येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत आयोजित या शिबिरात प्रलंबित कामांचा निपटारा जलद गतीने करण्यावर मुख्य भर दिला जाणार आहे. यामध्ये सातबारा उतारा, फेरफार नोंदी, वारस नोंद आणि महसुली प्रकरणांचा जलद निपटारा, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र आणि अधिवास (डोमासाइल) प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना. या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केवळ महसूलच नव्हे, तर कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, समाजकल्याण, अन्न व नागरी पुरवठा, पंचायत राज, नोंदणी व मुद्रांक, सहकार आणि वन विभाग या सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी एकाच ठिकाणी हजर राहणार आहेत. नागरिकांच्या अडचणी थेट ऐकून घेऊन त्यावर जागीच तोडगा काढला जाणार आहे. संगमेश्वर तालुक्यातील सर्व १४७ गावांतील नागरिकांसाठी ही एक उत्तम संधी आहे. नागरिकांनी आपल्या कामाशी संबंधित आवश्यक कागदपत्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार अमृता साबळे यांनी केले आहे.












