देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील आंबवली गावात सार्वजनिक मालमत्तेवर हात साफ करणाऱ्या दोन चोरांचा मनसुबा ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे उधळला गेला आहे. गावात बसवलेले स्ट्रीट लाईट चोरून पोबारा करण्याच्या तयारीत असलेल्या दोन चोरांना ग्रामस्थांच्या मदतीने देवरुख पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली आहे. गणेश गुरव (वय-२९) व संतोष देवळेकर (वय- ३६, दोघेही रा. उक्षी. ता. जि. रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत देवरूख पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंबवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. गावातील रस्त्यांवर बसवण्यात आलेले स्ट्रीट लाईट चोरट्यांच्या निशाण्यावर होते. रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दोन चोरटे अंधाराचा फायदा घेऊन आंबवली मुस्लीमवाडी येथे स्ट्रीट लाईट चोरत असताना काही सतर्क ग्रामस्थांच्या ही बाब निदर्शनास आली. ग्रामस्थांनी विलंब न करता तत्परता दाखवत पोलीसांना खबर दिली आणि एका बाजूने चोरट्यांची नाकेबंदी केली.
माहिती मिळताच देवरुख पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थ आणि पोलीसांच्या संयुक्त कारवाईमुळे चोरांना पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि दोन्ही आरोपींना पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे. या चोरीच्या मागे कोणती मोठी टोळी सक्रिय आहे का? तसेच यांनी यापूर्वी इतर कुठे अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत का? या दृष्टीने देवरुख पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत आहेत. ग्रामस्थांनी दाखवलेल्या या साहसाबद्दल आणि सतर्कतेबद्दल परिसरातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.













