सावंतवाडी।प्रतिनिधी :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलगाव जकात नाका परिसरातील जुन्या महामार्गावर मोकाट जनावरांचा वाढता वावर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी ही जनावरे रस्त्यावर बसून राहत असल्याने भीषण अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. पावसाळ्यात दृश्यमानता कमी असताना अचानक रस्त्यावर जनावरे आढळल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडते. अनेकदा अपघात थोडक्यात टळल्याच्या घटना घडल्या असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी मोकाट जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या संबंधित मालकांवर गुन्हे दाखल करून कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच महामार्ग परिसरात नियमित गस्त घालून मोकाट जनावरे हटविण्याची प्रभावी व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
वेळीच ठोस उपाययोजना न केल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.













