आईला विजेच्या धक्क्यातून वाचवताना ३१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; चिपळूण तालुक्यातील घटना

चिपळूण :
​चिपळूण तालुक्यातील खांदाटपाली (भुवडवाडी) येथे आईला विजेच्या धक्क्यातून वाचवण्याच्या प्रयत्नात एका ३१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अक्षय चंद्रकांत मेगे (वय ३१, रा. खांदाटपाली, भुवडवाडी, ता. चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव आहे. २८ जुलै रोजी अक्षय यांची आई चंद्रकला या घराच्या पडवीत वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी गेल्या असता, तिथे असलेल्या लोखंडी तारेत उतरलेल्या वीज प्रवाहामुळे त्यांना जोरदार धक्का बसला. आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पडवीत धाव घेतलेल्या अक्षयने जमिनीवर पडलेल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाही विजेचा तीव्र धक्का बसल्याने तो खाली कोसळला. अक्षयचा आवाज ऐकून शेजारी राहणारे संजय बाबू भुवड यांनी तातडीने धाव घेतली आणि श्वास चालू असलेल्या अक्षयला सकाळी ८:३० वाजता चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच सकाळी ९:०५ वाजता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.