कोकण आयुक्तांचे न्यायालय रत्नागिरी अथवा सिंधुदुर्ग येथे नियमित भरविण्याची मागणी

मुंबईत वारंवार जाण्याचा त्रास टाळण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अधिवक्ता परिषदेचे निवेदन

सिंधुदुर्ग, प्रतिनिधी : अधिवक्ता परिषद, कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर करून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल न्यायप्रकरणांच्या सुनावणीसाठी कोकण आयुक्तांचे न्यायालय रत्नागिरी अथवा सिंधुदुर्ग येथे नियमितपणे भरविण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील महसूल न्यायप्रकरणांच्या सुनावणीसाठी पक्षकार, अधिवक्ता आणि संबंधित नागरिकांना प्रत्येक सुनावणीसाठी मुंबई येथे जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागतो.

रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग येथे नियमितपणे कोकण आयुक्तांचे न्यायालय भरविण्यात आल्यास दोन्ही जिल्ह्यांतील प्रलंबित महसूल प्रकरणांचा जलद निपटारा होण्यास मदत होईल. तसेच पक्षकार, अधिवक्ता आणि नागरिकांचा प्रवासाचा खर्च, वेळ व श्रम यांची मोठ्या प्रमाणावर बचत होऊन न्यायप्रवेश अधिक सुलभ, प्रभावी आणि लोकाभिमुख होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शासनाने या मागणीची सकारात्मक दखल घेऊन रत्नागिरी अथवा सिंधुदुर्ग येथे ठराविक कालावधीनंतर नियमितपणे कोकण आयुक्तांचे न्यायालय भरविण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी अधिवक्ता परिषद, कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी ज्येष्ठ अधिवक्ता तथा माजी आमदार अजित गोगटे, अधिवक्ता परिषद प्रांत उपाध्यक्ष अभिषेक गोगटे, अधिवक्ता राहुल तांबोळकर, अधिवक्ता स्वप्नील सावंत, अधिवक्ता अग्निवेश तावडे, अधिवक्ता प्रतिमा सातवसे आदी उपस्थित होते.