परटवणे – वरचा फगरवठार रस्‍ता पूर्णच खचला; नागरिकांची मोठी गैरसोय

रत्‍नागिरी : प्रतिनिधी
शहरातील परटवणे येथून वरचा फगरवठार येथे जाणारा रस्‍ता बांधकाम व्‍यावसायिकाच्‍या चुकीमुळे खचला होता. याठिकाणी संरक्षण भिंतीचे काम सुरु असताना जवळपास पूर्ण रस्‍ताच खचल्‍याची घटना बुधवारी सायंकाळी उशिरा घडली. त्‍यामुळे हा मार्ग आता रहदारीसाठी बंद ठेवण्‍यात आला आहे. यामुळे येथील नागरिक व विद्यार्‍थ्यांना आता मोठा वळसा मारावा लागत असल्‍याने तीव्र नाराजी पसरली आहे.

परटवणे येथून वरचा फगरवठार येथे जाणार्‍या रस्‍त्‍याजवळ एका बांधकाम व्‍यावसायिकाने खोदाई केल्‍यामुळे पहिल्‍याच पावसात संरक्षक भिंत कोसळली होती. याठिकाणी रस्‍त्‍यालाही भेगा गेल्‍या होत्‍या. त्‍यामुळे नागरिक धोका पत्‍करुन याठिकाणाहून प्रवास करीत होते. येथील नागरिक आणि नगरसेवकांनी याबाबत तक्रार केल्‍यानंतर संबंधित बांधकाम व्‍यावसायिकाने संरक्षक भिंत बांधून देण्‍याचे मान्‍य केले होते. याठिकाणी संरक्षक भिंतीचे कामही सुरु झाले होते. अर्धी भिंत बांधण्‍यात आली होती. पुढील संरक्षण भिंत बांधण्‍यासाठी पाया खोदाईसाठी माती काढण्‍यात आली होती. त्‍यामुळे बुधवारी सायंकाळनंतर रस्‍त्‍याचा जवळपास 90 टक्‍के भाग पुन्‍हा ढासळला. त्‍यामुळे रस्‍ताच गायब झाल्‍याने पायी चालणेही याठिकाणी धोक्‍याचे बनले आहे. त्‍यामुळे संपूर्ण रस्‍ताच नगर परिषदेने वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे.

परटवणे ते फगरवठार हा मार्ग बंद झाल्‍यामुळे आता वरचा फगरवठार येथील विद्यार्थ्यांना व नागरिकांना डीएसपी बंगला येथून वळसा मारुन प्रवास करावा लागत आहे. त्‍यामुळे विद्यार्‍थ्यांचे मोठे हाल झाले आहेत. बांधकाम व्‍यावसायिकाने अधिकचा भाग पायासाठी खणल्‍यामुळेच हा रस्‍ता कोसळल्‍याचा आरोप स्‍थानिक नागरिकांनी केला असून, पाणी सभापती निमेश नायर यांनी अधिकार्‍यांसह या भागाची पाहणी केली. नगर परिषद याबाबत कोणती कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.