वैभववाडी प्रतिनिधी :
वाभवे-वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर आणि त्यांच्याकडून नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम हाती घेतली असून, गेल्या दोन दिवसांत शहरातील सुमारे २५ ते ३० कुत्र्यांना पकडण्यात आल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाने दिली.
गेल्या काही महिन्यांपासून शहरातील रस्ते, बाजारपेठ व सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला होता. अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती.
नागरिकांच्या मागणीची दखल घेत नगरपंचायत पदाधिकारी व प्रशासनाने भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असून, शहरातील सर्व भागांतील भटक्या कुत्र्यांना टप्प्याटप्प्याने पकडण्यात येणार आहे.
नगरपंचायतीने वेळेवर ही कारवाई सुरू केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.












