शिक्षण, आरोग्य आणि संस्कृतीच्या जतनाची सांगड घालणे काळाची गरज : तहसीलदार दीक्षांत देशपांडे
कणकवली : आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शिक्षण, आरोग्य सुविधा आणि पारंपरिक संस्कृतीचे जतन या तिन्ही बाबींची सांगड घालणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले.
कणकवली येथील अखंड लोकमंचच्या सभागृहात आयोजित ‘उलगुलान मेळा’ सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला डॉ. सतीश पवार, प्रा. राजेंद्र मुंबरकर, निलेश पवार, शैला कदम, नामानंद मोडक, पत्रकार विजय गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री. देशपांडे म्हणाले की, १९८२ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या बैठकीनंतर १९९४ सालापासून ९ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. आदिवासी हे या देशाचे मूळ रहिवासी असून त्यांची मुळे या मातीत अतिशय घट्ट रुतलेली आहेत. आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध संस्था आणि प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना वेळेत जातीचे दाखले मिळवून देणे, शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आणि आरोग्य यंत्रणा सक्षम करणे यावर प्रशासनाचा मुख्य भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जमिनीचे प्रश्न किंवा निवाऱ्याच्या अडचणींबाबत बोलताना तहसीलदार देशपांडे यांनी कायदेशीर अडचणी येत असल्या तरी प्रशासनाच्या हातात असलेल्या सर्व बाबींमध्ये पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच, आधुनिकतेच्या प्रवाहात आदिवासींची मूळ भाषा, पारंपरिक नृत्य, गीते आणि पोशाख हरवत चालल्याची खंत व्यक्त करत त्यांनी हे सांस्कृतिक वैभव जपण्याचे आवाहन त्यांनी केले.
या सोहळ्यानिमित्त कणकवली शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली पटकी देवी येथून सुरू होऊन बाजारपेठ मार्गे पटवर्धन चौकात आली. तेथून पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली. या दरम्यान सादर करण्यात आलेला चित्ररथ देखावा, पारंपरिक नृत्ये आणि गीते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.











