बांदा (प्रतिनिधी):
इन्सुली-डोबाशेळ येथील तिलारी कालव्यात एका अनोळखी वृद्ध पुरुषाचा मृतदेह गोधडीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी वृद्धाचा घातपात असल्याचा संशय आहे.
कालव्याच्या पाण्यात मृतदेह तरंगताना स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. मृतदेहाजवळ गोधडी आढळल्याने या घटनेबाबत संशय अधिक गडद झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कालव्याच्या पाण्यात मृतदेह दिसल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. मृतदेहाजवळ गोधडी आढळून आल्याने हा मृतदेह रात्रीच्या वेळी कालव्यात आणून टाकला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
अन्यत्र कुठेतरी घातपात करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो गोधडीत गुंडाळून कालव्यात फेकून देण्यात आला असावा, असा संशय स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. मात्र, या मृत्यूचे नेमके कारण काय आहे आणि हा प्रकार घातपाताचा आहे की अन्य काही कारणांमुळे मृत्यू झाला आहे, हे पोलिसांच्या सखोल तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.













