गणित विषयातील पीएचडीबद्दल आर. पी. डी. हायस्कूलमध्ये सोहळा
सावंतवाडी:
राजस्थान येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पिलानी) येथून गणित विषयात नुकतीच पीएचडी संपादन केल्याबद्दल सावंतवाडीचे सुपुत्र डॉ. विक्रम नाईक यांचा ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे आर. पी. डी. हायस्कूलमध्ये विशेष सन्मान सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी पतपेढीचे चेअरमन रमेश बोंद्रे उपस्थित होते. गुणवंतांचा गौरव करून कौतुकाची थाप देणे आणि भविष्यातील कार्यासाठी प्रोत्साहन देऊन उमेद वाढवणे या उद्देशाने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थापक वाय. पी. नाईक यांनी प्रास्ताविक करून मंडळ राबवीत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला, तसेच उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या निमित्ताने गुरुवंदन कार्यक्रमही अत्यंत आनंदात साजरा करण्यात आला.
डॉ. विक्रम नाईक यांनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण मिलाग्रीज हायस्कूल, बारावी विज्ञान आर. पी. डी. ज्युनियर कॉलेज, बी.एससी. संत राऊळ महाविद्यालय कुडाळ आणि एम.एससी. मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले आहे. तसेच सेट, नेट व गेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पिलानी येथून गणित विषयात पीएचडी पदवी मिळवली. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध संस्था व मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात मिलाग्रीज हायस्कूलतर्फे जी. आर. कालकुंद्रीकर, आर. पी. डी. हायस्कूलतर्फे प्रा. बी. आर. नंदिहळ्ळी, प्रा. अजय कामत, प्रा. संतोष पाथरवट, संत राऊळ महाविद्यालयातर्फे प्रा. अरुण पणदूरकर, सावंतवाडी पतपेढीतर्फे उमाकांत वारंग, कळसुलकर हायस्कूलतर्फे प्रदीप सावंत, सिद्धेश कुळकर्णी, पी. बी. बागुल, तसेच विलास कासकर, अनिल कांबळे, सुरेश काळे, ओटवणे येथील कांबळे, धोगडे, भरत गावडे, विठ्ठल कदम, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, विनायक गावस, सुनील नेवगी, संजय बांबुळकर आणि निवृत्त मुख्याध्यापक एस. आर. मांगले आदी मान्यवरांनी त्यांचा विशेष सन्मान केला.
याच कार्यक्रमादरम्यान ज्ञानदीपचे संस्थापक वाय. पी. नाईक यांची अखिल भारतीय नाईक रामोशी बेरड समाज विकास परिषद, पुणेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला व्यासपीठावर अध्यक्ष रमेश बोंद्रे यांच्यासह गणपती कालकुंद्रीकर, उमाकांत वारंग, जावेद शेख, डॉ. विक्रम नाईक, प्रदीप सावंत, प्रा. अरुण पणदूरकर, प्रा. बी. आर. नंदिहळ्ळी, निलेश पारकर, भरत गावडे, विठ्ठल कदम आणि एस. आर. मांगले आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना गणपती कालकुंद्रीकर, उमाकांत वारंग, बाळासाहेब नंदिहळ्ळी, अरुण पणदूरकर, संतोष पाथरवट आणि अजय कामत यांनी डॉ. विक्रम नाईक यांच्या यशाबद्दल, त्यांची चिकाटी, जिद्द, मृदू स्वभाव, शांत संयमी वृत्ती, अभ्यासाचे नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा गौरव केला. डॉ. विक्रम यांनी क्रिकेट खेळातही नैपुण्य प्राप्त केले असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. सत्काराला उत्तर देताना डॉ. विक्रम नाईक यांनी आपल्या यशामागे शिक्षक, आई-वडील आणि मित्रपरिवाराचे आशीर्वाद व शुभेच्छा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे मनोगतात व्यक्त केले. डॉ. विक्रम हे वाय. पी. नाईक यांचे सुपुत्र होत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव केंकरे यांनी केले, तर आभार निलेश पारकर यांनी मानले. या प्रसंगी शिक्षक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.











