DYSP सुरेश कदम,पोलीस निरीक्षक अमितकुमार यादव यांची प्रमुख उपस्थिती
साखरपा वार्ताहर:
संगमेश्वर तालुक्यातील प्रा. आबा सावंत कला व वाणिज्य महाविद्यालय, साखरपा या महाविद्यालयाचा २५ वा रौप्यमहोत्सवी सोहळा अत्यंत दिमाखदार आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी पोलीस उपअधीक्षक (DYSP) सुरेश कदम आणि सन्माननीय अतिथी म्हणून देवरुख पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अमितकुमार यादव, रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बापू शेट्ये व संस्थेचे अध्यक्ष प्रा.आबाजी सावंत उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या स्वतःच्या अधिकृत ध्वजाच्या ध्वजारोहणाने झाली. साखरपा पोलिस उप निरीक्षक मा. प्रमोद वाघाटे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक ध्वजारोहण करण्यात आले, यानंतर सर्व उपस्थितांनी राष्ट्रगीत म्हणून ध्वजाला मानवंदना दिली.
महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा.शिल्पा वैद्य यांनी आपल्या प्रास्ताविकातून कॉलेजच्या गेल्या २५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला उजाळा दिला.
या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना DYSP श्री सुरेश कदम यांनी सोशल मीडिया हे खूप चांगले असून खड्ड्यात पण नेणारे आहे, सोशल मीडिया वरचे प्रेम हे फक्त शरीरावरचे प्रेम असते. जेलमध्ये जाणे म्हणजे नरकात गेल्यासारखे आहे,आई बाबांचे संस्कार शेवटपर्यंत तुम्हाला उपयोगी पडणारे आहेत. तसेच सायबर गुन्हेगारी बाबत मार्गदर्शन करून या कार्यक्रमासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच पोलीस निरीक्षक अमित कुमार यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईल हा आपला मित्र आहे त्याचबरोबर शत्रू सुद्धा आहे, मोबाईल वापरताना सावधान रहा, मोबाईलचा वापर मर्यादित करा, वेळेचे भान ठेवून कष्ट केला तर आयुष्यात यशस्वी व सुखी व्हाल, आई वडील व शिक्षक तुमच्याकडून चांगल्या अपेक्षा ठेवून असतात याची जाणीव ठेवा व मेंदू ठिकाणावर ठेवायचा असेल तर व्यसनापासून दूर राहा असा मोलाचा सल्ला श्री यादव यांनी दिला.
तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री बापू शेटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गावातीलच उदाहरणे देऊन गून्हया पासून चार हात लांब राहा, कायदा हातात घेऊ नका असे सांगून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
तद्नंतर संस्थेचे संचालक प्रा.संतोष चव्हाण यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले की, एका छोट्याशा रोपट्याचे रूपांतर आज २५ वर्षांनी वटवृक्षात झाले असून, इथून शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी आज समाजात विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत.
या कार्यक्रमासाठी पोलिस उपअधीक्षक मा. सुरेश कदम , पोलीस निरीक्षक मा. अमितकुमार यादव आणि त्यांचा सर्व विभागाचा स्टाफ, बापू शेट्ये,संस्थेचे अध्यक्ष प्रा आबाजी सावंत,
महात्मा गांधी विद्यालयाचेे मुख्याध्यापक मा. विजय बाईंग आणि त्यांचा स्टाफ, , मा. मधूकर पांचाळ, प्रा. संतोष चव्हाण, श्री.प्रवीण बाईंग, श्री .रमाकांत शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.
गुरुनाथ सुर्वे, सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बन्ने व आभार प्राध्यापक प्रसाद झेपले यांनी मानले.













