रत्नागिरी:
रत्नागिरी पोलिस दलाने अज्ञात मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी एक महत्त्वाचे आणि आधुनिक पाऊल उचलले आहे. ‘RAIDS’ (Rapid AI-based Identification & Detection System) या अॅपचा आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून सावित्री नदीच्या पात्रात सापडलेल्या एका अज्ञात पुरुषाच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.
गेल्या ९ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मंडणगड तालुक्यातील शिपोळे आणि उमरोली जेट्टीदरम्यान, सावित्री नदी व बाणकोट खाडीच्या खाजन परिसरात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता.
मृत व्यक्तीचे वर्णन:वय: अंदाजे २५ ते ३० वर्षे; कपडे: मळलेला व फाटलेला फुल शर्ट, निळ्या रंगाची पँट, लेदरचा बेल्ट आणि निळी अंडरवेअर.; विशेष खूण: उजव्या मनगटावर निळ्या रंगाचे हृदयाच्या आकाराचे टॅटू गोंदलेले असून त्यात काही अस्पष्ट अक्षरे किंवा खुणा आहेत.
बाणकोट पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक मितेश केणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाची ओळख पटवणे कठीण जात असल्याने रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘RAIDS’ अॅपचा वापर करण्यात आला. मृतदेहाच्या उपलब्ध छायाचित्रांवरून AI तंत्रज्ञानाद्वारे त्या व्यक्तीचे जिवंतपणीचे संभाव्य चेहरे (AI-reconstructed images) तयार करण्यात आले आहेत.
तयार करण्यात आलेली ही संभाव्य चित्रे सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांद्वारे प्रसारित केली जात आहेत. या चित्रांवरून किंवा दिलेल्या वर्णनावरून या व्यक्तीबद्दल कोणालाही काही माहिती मिळाल्यास, त्यांनी तत्काळ बाणकोट पोलिस ठाणे, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.












