कुडाळ वालावल रस्त्यावर भावई मंदिर पुलाजवळ मोठा खड्डा

अपघाताची शक्यता : बांधकाम विभागाचा वेधला लक्ष 

त्वरित दुरुस्त करण्याची ग्रामपंचायतीची मागणी

कुडाळ : कुडाळ-वालावल-चेंदवण-कवठी या मुख्य रस्त्यावर वालावल येथील भावई मंदिर पुलाच्या नजीक रस्त्याच्या मधोमध एक अत्यंत मोठा आणि खोल खड्डा पडला आहे. या धोकादायक खड्ड्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या वाहनचालक व पादचाऱ्यांच्या जिवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने, शाळकरी मुले, नोकरदार आणि नागरिक सतत ये-जा करत असतात. हा खड्डा अतिशय खोल असल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांचा अंदाज चुकतो, ज्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. वेळीच याकडे लक्ष न दिल्यास एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत वालावल ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कुडाळचे उपविभागीय अभियंता यांना अधिकृत पत्र पाठवून तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे.

भविष्यातील अनर्थ टाळण्यासाठी या मुख्य रस्त्यावरील खड्ड्याची त्वरित दुरुस्ती करून रस्ता पूर्ववत सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली आहे.

तसेच या प्रकरणी प्रशासनाकडून विलंब झाल्यास आणि पुढे कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील, असा स्पष्ट इशाराही ग्रामपंचायतीने पत्राद्वारे दिला आहे.