कशेळी-गावखडी रस्त्यावर रुग्णवाहिका आणि टेम्पोचा अपघात; रुग्णवाहिका चालकावर गुन्हा

रत्‍नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील कशेळी ते गावखडी-रत्‍नागिरी रस्त्‍यावरील बौध्दवाडी एस.टी.स्टॉपच्या पुढे बेदरकारपणे रुग्णवाहिका चालवून समोरुन येणाऱ्या टेम्पोला धडक देत अपघात केला. अपघाताची ही घटना सोमवार 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वा.सुमारास घडली असून चालकाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिरोज ताहिर अली आलम (रा.रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर, ईस्ट, मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्‍याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल प्रविण वीर यांनी तक्रार दिली आहे. त्‍यानुसार, सोमवारी सायंकाळी फिरोज आलम हा आपल्या ताब्यातील रुग्णवाहिका (एमएच-05-ईएल-1821) घेउन भरधाव वेगाने कशेळी ते गावखडी-रत्‍नागिरी रस्त्‍यान येत होता. तो गावखडी बौध्दवाडी एस.टी.स्टॉपच्या पुढे काही अंतरावर वळणात आला असता त्‍याने समोरुन येणाऱ्या टेम्पो (एमएच-09-जीजे-3542) ला चालकाच्या दरवाजाजवळ जोराची धडक देत अपघात केला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून अधिक तपास पूर्णगड पोलिस करत आहेत.