साडेचार लाखांचा मुद्देमाल सावंतवाडी वनविभागाने केला जप्त
सावंतवाडी:मळगाव-निरवडे रस्त्यावर विनापरवाना खैराच्या लाकडांची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने जप्त केली आहे. ही कारवाई दिनांक १२ ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. या कारवाईत लाकडांसह वाहन असा एकूण सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, मळगाव-निरवडे रोडवरून खैराच्या लाकडांची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची गुप्त बातमी वनविभागाला मिळाली होती. त्या आधारे वनविभागाच्या पथकाने सापळा रचून बोलेरो पिकअप वाहन क्रमांक (एम एच ०७ एजे ००८७ )थांबवले. वाहनाची पाहणी केली असता त्यात २.८९ घ.मी. खैर किटा साठा विनापरवाना वाहून नेला जात असल्याचे उघडकीस आले. वनविभागाने तत्काळ वाहनासह लाकडाचा साठा ताब्यात घेतला असून जप्त केलेला मुद्देमाल व वाहन पुढील कारवाईसाठी उपरल विक्री आगार येथे जमा करण्यात आले आहे.
याप्रकरणी वनरक्षक पाडलोस यांच्याकडे प्रथम गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून प्र. गु. री. क्र. ०४/२०२६, दिनांक १२/०८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वनविभागाकडून वेगाने सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत आजगावचे वनपाल विजय दाते, पाडलोसचे वनरक्षक प्रकाश राणगीरे, सावंतवाडीचे फिरते पथक तसेच सावंतवाडी वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.












