प्रदर्शन, विक्री व पाककृती स्पर्धेत शेतकरी, महिला बचत गट व नागरिकांचा मोठा सहभाग
लांजा (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) रत्नागिरी अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय, लांजा यांच्या वतीने आयोजित रानभाजी महोत्सव, रानभाजी प्रदर्शन, विक्री व रानभाजी पाककृती स्पर्धेला शेतकरी, महिला बचत गट व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शहरातील कुलकर्णी काळे छात्रालय, लांजा येथे हा कार्यक्रम झाला. कोकणातील पारंपरिक रानभाज्यांचे संवर्धन करणे, त्यांचे पौष्टिक व आरोग्यदायी महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविणे, स्थानिक महिला बचत गट व शेतकरी गटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच रानभाज्यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर उत्पन्नवाढीस चालना देणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश होता.
महोत्सवाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती सौ .मानसी आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य रसिका मेस्त्री, साक्षी चव्हाण, दिपाली साळवी, उपविभागीय कृषी अधिकारी रत्नागिरी फिरोज शेख, नायब तहसीलदार अनिल गोसावी, गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, कृषी विज्ञान केंद्र देवधेचे प्रमुख डॉ. आनंद हनुमंते, नायब तहसीलदार दर्शन देसाई, तालुका कृषी अधिकारी लांजा अभिजीत शेलार, कल्पना कॉलेजचे शिक्षक चंदन कातळकर व प्रीतम तेंडुलकर, कृषी अधिकारी सुभाष गुरव, डीआरपी आरिता तेंडुलकर, रत्नागिरी काजू प्रक्रिया युनिटचे अध्यक्ष जयवंत विचारे, मंडळ कृषी अधिकारी लांजा-१ संजय कदम, मंडळ कृषी अधिकारी लांजा-२ कैलास शिंदे, मंडळ कृषी अधिकारी भांबेड अनिल मोरे, तसेच सर्व उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते.
महोत्सवात विविध प्रकारच्या पारंपरिक रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. तसेच रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या विविध पौष्टिक व आकर्षक पदार्थांचे सादरीकरण पाककृती स्पर्धेत करण्यात आले. या उपक्रमातून रानभाज्यांचे पारंपरिक ज्ञान, त्यांचे औषधी व पौष्टिक गुणधर्म तसेच विविध पाककृती नागरिकांना जाणून घेता आल्या.
रानभाजी पाककृती स्पर्धेतील विजेत्यांना दि. १५ ऑगस्ट रोजी बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालय, लांजा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गौरी शेरे तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.














