दापोली-खेड मार्गावरील मोरी खचली; निकृष्ट कामामुळे अपघाताचा धोका वाढला

खेड :
दापोली-खेड मार्गावरील दापोली शहरातील नशेमन कॉलनी परिसरात नुकतीच बांधण्यात आलेली मोरी खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोरी खचल्यामुळे रस्त्याला मोठे भगदाड पडले असून या प्रकारामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांनी या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सध्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असताना नव्याने बांधलेली मोरी एवढ्या कमी कालावधीत खचल्याने संबंधित काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास मोरीचे आणखी नुकसान होण्याची शक्यता असून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कायमस्वरूपी दुरुस्ती होईपर्यंत या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, तसेच मोरीच्या निकृष्ट कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.