औद्योगिक दराऐवजी डिझेलची कॅटेगरी बदलण्याची मच्छीमारांची मागणी
देवगडमध्ये पाच नौकांचे इलेक्ट्रिक कन्वर्जन पायलट प्रोजेक्ट राबविणार
आनंदवाडी प्रकल्पासाठी ८५ कोटींची तरतूद; पुढील वर्षभरात काम पूर्ण करण्याचे आश्वासन
देवगड, दि. १३ ऑगस्ट : मच्छीमारांना सध्या औद्योगिक दराने डिझेलचा पुरवठा होत असून, त्याचा दर सुमारे १४० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचला आहे. मच्छीमारांना हा डिझेल दर १०० रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्यामुळे डिझेलची कॅटेगरी बदलून मच्छीमारांना कमी दरात डिझेल उपलब्ध करून देण्यासाठी मच्छीमार नेत्यांसह दिल्ली येथे केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमारांच्या शिष्टमंडळाला दिले.
वाहनांसाठी पेट्रोल पंपावर सुमारे १०५ रुपये प्रतिलिटर दराने डिझेल उपलब्ध होते. मात्र मच्छीमारांना औद्योगिक दराने डिझेल मिळत असल्याने त्यांच्या मासेमारी व्यवसायावरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मच्छीमारांना कमी दरात डिझेल मिळण्यासाठी डिझेलची कॅटेगरी बदलावी, अशी मागणी यावेळी मच्छीमारांनी केली.
देवगड फिशर मेन्स सोसायटी, तारामुंबरी मच्छीमारी सोसायटी, देवदुर्ग मच्छीमार सोसायटी यांच्यासह देवगड तालुक्यातील विविध मच्छीमार सोसायट्यांचे प्रतिनिधी, संचालक तसेच मच्छीमार नेते यावेळी उपस्थित होते. सोसायट्यांच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
दरम्यान, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा मच्छीमारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नितेश राणे यांनी केले. इलेक्ट्रिक बोटींचा वापर करण्यासाठी मच्छीमारांनी पुढाकार घ्यावा. देवगड तालुक्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून पाच मच्छीमारी नौकांचे इलेक्ट्रिक कन्वर्जन करण्याचा प्रकल्प राबविण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
मच्छीमारांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मच्छीमारांना विमा संरक्षण मिळत नसल्याची अडचणही यावेळी मांडण्यात आली. विमा योजनेतील ही वयोमर्यादेची अट शिथिल करण्यासाठी विमा कंपन्यांशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन नितेश राणे यांनी दिले.
आनंदवाडी प्रकल्पाबाबतही यावेळी चर्चा झाली. हा प्रकल्प पुढील वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न असून, प्रकल्पांतर्गत गाळ काढणे तसेच लिलावगृह उभारण्याची कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी ८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पावसाळ्यानंतर आनंदवाडी प्रकल्पाच्या कामाला आणखी वेग येईल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.
मच्छीमारांच्या विविध प्रश्नांवर शासनस्तरावर पाठपुरावा करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी देवगड फिशरमेन्स सोसायटीचे चेअरमन द्विजकांत कोयंडे, तारामुंबरी सोसायटीचे चेअरमन काका प्रभू, देवदुर्ग मच्छीमार संस्थेचे चेअरमन तुषार पारकर, जगन्नाथ कोयंडे, सचिन कदम, उमेश आंबेरकर, उल्लास मंचेकर, देवगड फिशरमेन्स सोसायटीचे सचिव उमेश कदम, तारामुंबरी सोसायटीच्या व्यवस्थापक नेत्रा खवळे, देवदुर्ग मच्छीमार संस्थेचे सचिव कृष्णा परब, राहुल मुणगेकर आदी संस्थांचे पदाधिकारी व मच्छीमार उपस्थित होते.
तसेच माजी आमदार अजित गोगटे आणि बाळ खडपे हेही उपस्थित होते.











