खांबाळे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे कारवाई
वैभववाडी प्रतिनिधी :
वैभववाडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चारचाकी वाहनातून संशयास्पदरीत्या फिरून विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या तिघांना खांबाळे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीनंतर तहसीलदार कार्यालयामार्फत संबंधित तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी त्यांना योग्य ती समज देऊन सोडून देण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील विविध गावांमध्ये काही व्यक्ती चारचाकी वाहनातून फिरून घरगुती वापराच्या वस्तूंची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या व्यक्तींकडून काही नागरिकांची फसवणूक झाल्याची चर्चाही परिसरात होती. त्यामुळे पोलिसांनी तालुक्यातील सर्व गावांतील नागरिकांना पोलीस पाटलांमार्फत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, गुरुवारी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास खांबाळे येथील ग्रामस्थांना चारचाकी वाहनातून फिरणारे तिघे संशयास्पदरीत्या आढळून आले. ग्रामस्थांनी त्यांना हटकून याबाबत वैभववाडी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
ताब्यात घेतलेल्या तिघांमध्ये जीवन पोपट कुंभार (रा. पन्हाळा, जि. कोल्हापूर), सुप्रिया समीर पाटील (रा. कोल्हापूर) आणि रुक्सना अमीर मेस्त्री (रा. कळंबा, कोल्हापूर) यांचा समावेश आहे. पोलिसांनी चौकशी केली असता ते घरगुती वापराच्या वस्तूंची विक्री करीत असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, गावांमध्ये फिरून वस्तूंची विक्री करण्यासाठी आवश्यक परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तिघांना तहसीलदार कार्यालयात हजर केले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून योग्य ती समज देण्यात आली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी उशिरा त्यांना सोडून देण्यात आले.










