विलवडेत दिवसाढवळ्या घरफोडी, ११ लाखांचे दागिने लंपास

​बांदा : प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या तयारीसाठी मूळ तांबुळी गावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने विलवडे येथील एका घरातून सुमारे ११ लाख रुपयांचे दागिने आणि १९ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. ही घटना मंगळवारी दुपारी टेंबवाडी येथे बांदा-दाणोली जिल्हा मार्गालगत भरदिवसा घडली. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

​विलवडे टेंबवाडी येथील विलास गणपत सावंत आणि सुभाष गणपत सावंत यांचे एकत्रित घर आहे. विलास सावंत हे कुटुंबासह बाहेर राहतात. तर सुभाष सावंत आणि त्यांचे कुटुंब या घरात वास्तव्यास आहेत. गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी सुभाष सावंत आणि त्यांच्या पत्नी सकाळी १० वाजता त्यांच्या मूळ गावी तांबुळी येथे गेले होते.

​चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत दुपारी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप टिकावाने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील दोन्ही कपाटे फोडून त्यातील सोन्याचा हार, मंगळसूत्र, कानातले कुडे आणि इतर दागिने तसेच १९ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

​सायंकाळी चारच्या सुमारास सुभाष सावंत घरी परतल्यावर त्यांना दरवाजा उघडा दिसला. घरात प्रवेश केल्यावर कपाटे फोडलेली आणि दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ शेजाऱ्यांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रकाश दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, पोलीस पाटील दीपक नाईक यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
​त्यानंतर बांदा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे आणि श्वान पथकही घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा सुरू केला आहे.