देवरूख (प्रतिनिधी) :
फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गेल्या तीन वर्षांपासून पोलीसांना गुंगारा देणाऱ्या फरार आरोपीच्या अखेर देवरुख पोलीसांनी पनवेल येथून मुसक्या आवळल्या आहेत. तेजस किबदीयानी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तेजस याच्याविरूध्द तीन वर्षांपूर्वी देवरुख पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६४, ४६७, ४७१ आणि ३४ अन्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलीसांना गुंगारा देऊन सतत आपले स्थान बदलत फरार होता. दरम्यान, आरोपी तेजस किबदीयानी हा सध्या पनवेल परिसरात वावरत असल्याची गोपनीय माहिती देवरुख पोलीसांना मिळाली. माहितीची खातरजमा होताच पोलीस पथकाने तात्काळ पनवेल गाठले. तेथे अत्यंत गुप्तपणे सापळा रचून आरोपीला शिताफीने पकडले आणि ताब्यात घेतले.
तीन वर्षांपासून पोलीसांना चकवा देणारा आरोपी अखेर पोलीसांच्या जाळ्यात अडकला. ही यशस्वी आणि कौतुकास्पद कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक नितिन बगाटे, पोलीस उपअधिक्षक सुरेश कदम, देवरुख पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन कामेरकर, संजय करांडे, सचिन लगारे यांनी पार पडली. गेल्या तीन वर्षांपासून तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे पाठपुरावा करून फरार आरोपीला गजाआड केल्याबद्दल देवरूख पोलीसांच्या या विशेष तपास पथकाचे नागरिकांमधून व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विशेष कौतुक होत आहे.












