सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या सावर्डे विद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

  चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्रि शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताच्या सामूहिक गायनाने झाली. त्यानंतर संस्थेचे विश्वस्त तसेच विद्यालयाच्या शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी ध्वजाला मानवंदना दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, राज्यगीत आणि ध्वजगीत सादर केले. तीन कौमी नाऱ्यांच्या घोषणेनंतर ध्वजप्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांचे सुमधुर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. इयत्तानिहाय उत्कृष्ट खेळाडू, जनरल चॅम्पियनशिप विजेता खेळाडू, विविध शालेय व बाह्य स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत गत शैक्षणिक वर्षात विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले. स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित संचलन व संगीत कवायतीमध्ये विद्यालयातील ५५२ विद्यार्थी, ४२ शिक्षक आणि ११८ पालकांनी सहभाग घेतला. त्यामुळे संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण आणि पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे आणि प्रशांत सपकाळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी यासाठी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज कुलकर्णी यांनी प्रभावीपणे केले. या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाच्या या भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त, एकात्मता आणि राष्ट्रनिष्ठेची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले. या कार्यक्रमासाठी सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव महेश महाडिक विश्वस्त गुलाबराव सुर्वे हरिश्चंद्र सुर्वे माजी प्राचार्य अन्वर मोडक रफिक मोडक विद्यालयाचे माजी शिक्षक सलीम मोडक सुधीर महाडिक दिलीप डंबे गुरव बामणे तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सदस्य शालेय विविध समितीचे सभासद प्रतिष्ठित पालक माजी विद्यार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.