खेड (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित ५९ व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवात घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, लवेलच्या विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेचा नावलौकिक उंचावला.
मराठी कथाकथन स्पर्धेत सार्थक जाधव, क्ले मॉडेलिंगमध्ये शिवम कदम, शास्त्रीय तालवाद्य एकलमध्ये गंधार संकपाळ आणि शास्त्रीय स्वरवाद्य एकल स्पर्धेत श्रावणी संकपाळ यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
एकांकिका स्पर्धेत सुयश शिवलकर, साक्षी तारकर, रिद्धी जोशी, सागर कुडकर, अल्पेश सकपाळ, श्रावणी संकपाळ, कुणाल पाटील, चैतन्य कदम, सार्थक सावंत आणि सार्थक कोटकर यांच्या संघाने उत्कृष्ट अभिनय सादर करत द्वितीय क्रमांक पटकावला.
वक्तृत्व स्पर्धेच्या गट ‘अ’ मध्ये आदित्य गमरे आणि गट ‘ब’ मध्ये सलोनी म्हादलेकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. भारतीय सुगम गायनात स्वराज साळुंखे, भारतीय शास्त्रीय नृत्य एकलमध्ये मनस्वी शिरकर, तर पाश्चात्य समूहगायन स्पर्धेत आर्यन खेडेकर, चिन्मय कोकाटे, सलोनी चव्हाण, वेदांत शिंदे, अनुज शिरसागर, गंधार संकपाळ आणि श्रवण मयेकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.
या युवा महोत्सवाला कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेडचे वर्क्स मॅनेजर प्रशांत ढमढेरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. निलेश सावे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील आणि उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व स्वयंसेवकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच साहित्य, नाट्य, संगीत, नृत्य आणि ललित कला क्षेत्रातही संस्थेचा लौकिक वाढवल्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. मुंबई येथे होणाऱ्या पुढील फेरीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.












