कोकण रेल्वे प्रवाशांना दिलासा; दोन एक्स्प्रेस गाड्यांना कायमस्वरूपी अतिरिक्त डबे

अजमेर-एर्नाकुलम ‘मरू सागर’ एक्स्प्रेसमध्ये स्लीपरचा एक डबा वाढला

हैदराबाद-वॉस्को द गामा एक्स्प्रेसमध्येही अतिरिक्त डब्यांची सुविधा

मुंबई, १७ ऑगस्ट : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी असून, उत्तर पश्चिम रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वेने दोन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डबे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक आसन क्षमता उपलब्ध होणार आहे.

अजमेर-एर्नाकुलम ‘मरू सागर’ एक्स्प्रेस

गाडी क्रमांक १२९७८/१२९७७ अजमेर जंक्शन-एर्नाकुलम जंक्शन ‘मरू सागर’ एक्स्प्रेसमध्ये डब्यांची कायमस्वरूपी पुनर्रचना करण्यात आली आहे. गाडीची एकूण संख्या २२ एलएचबी डबे इतकीच राहणार आहे.

सुधारित संरचनेनुसार फर्स्ट एसी १, सेकंड एसी २, थर्ड एसी ६, स्लीपर ६, जनरल ४, पॅन्ट्री कार १, जनरेटर कार १ आणि एसएलआर १ असे डबे असतील.

यापूर्वी या गाडीत स्लीपरचे ५ आणि थर्ड एसी इकॉनॉमीचा १ डबा होता. आता थर्ड एसी इकॉनॉमीचा डबा काढून त्याऐवजी स्लीपरचा एक डबा वाढविण्यात आला आहे.

ही सुधारित संरचना गाडी क्रमांक १२९७८ अजमेर जंक्शनहून २३ ऑक्टोबर २०२६ पासून आणि गाडी क्रमांक १२९७७ एर्नाकुलम जंक्शनहून २५ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहे.

हैदराबाद-वॉस्को द गामा एक्स्प्रेस

गाडी क्रमांक १७०२१/१७०२२ हैदराबाद-वॉस्को द गामा-हैदराबाद एक्स्प्रेसमध्येही कायमस्वरूपी एक अतिरिक्त डबा वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या गाडीची एकूण डब्यांची संख्या ११ वरून १२ झाली आहे.

सुधारित संरचनेनुसार सेकंड एसी १, थर्ड एसी ३, स्लीपर ५, जनरल २ आणि एसएलआर २ असे एकूण १२ डबे असतील.

यापूर्वी या गाडीत सेकंड एसी १, थर्ड एसी २, स्लीपर ४, जनरल २ आणि एसएलआर २ असे एकूण ११ डबे होते. त्यामुळे थर्ड एसी आणि स्लीपरचा प्रत्येकी एक डबा वाढविण्यात आला आहे.

ही सुधारित संरचना गाडी क्रमांक १७०२१ हैदराबादहून १३ ऑगस्ट २०२६ पासून आणि गाडी क्रमांक १७०२२ वॉस्को द गामा येथून १४ ऑगस्ट २०२६ पासून लागू करण्यात आली आहे.

या गाड्यांचे सविस्तर थांबे आणि वेळापत्रक भारतीय रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवाशांनी सुधारित डब्यांची माहिती नोंदवून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.