आसोली गावात आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रम संपन्न…

वेंगुर्ले : प्रतिनिधी

नागरिकांमध्ये आर्थिक व्यवहारांविषयी जागरूकता निर्माण करून त्यांना सुरक्षित व सक्षम आर्थिक नियोजनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी धान फाउंडेशन अंतर्गत आर्थिक साक्षरता केंद्र, वेंगुर्ला यांच्या वतीने आरबीआय व जिल्हा अग्रणी बँकेच्या सहकार्याने आसोली ग्रामपंचायत येथे आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी अग्रणी जिल्हा अधिकारी श्रीमती बेनाझीर शेख, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री ऋषिकेश गावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या आयोजनात धान फाउंडेशन चे समन्वयक श्री सहदेव परब, असोसिएट श्रीमती अस्मिता गावडे व श्रीमती समीक्षा आरोसकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी आसोली ग्रामपंचायतीचे सरपंच बाळा मधुकर जाधव, उपसरपंच शितल विष्णू घाडी आणि ग्रामसेवक दत्तात्रय पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच सीआरपी संपदा साईनाथ नाईक, अवनी अमित गावडे, पूजा प्रल्हाद तुळसकर, रूपा रघुनाथ चव्हाण, तसेच आरती अरुण सांगळे (पशुसखी) यांचीही कार्यक्रमास उपस्थिती होती.

कार्यक्रमामध्ये नागरिकांना बँकिंग सेवा, डिजिटल बँकिंग, आर्थिक सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा योजना, बचत, आर्थिक नियोजन, विमा तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सुरक्षित डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी आणि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमास आसोली गावातील महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. नागरिकांनी विविध आर्थिक विषयांवर प्रश्न विचारून मान्यवरांकडून मार्गदर्शन घेतले.“आर्थिक साक्षर नागरिक हे सक्षम कुटुंब आणि समृद्ध समाजाचे आधारस्तंभ आहेत,” असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.