राजापूर प्रतिनिधी: राजापुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, राजापूर आणि समर्थ नगर जलतरण क्लब, समर्थ नगर, राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक गणपती उत्सव शतकपूर्ती महोत्सवानिमित्त गुरुवर्य कै. आनंद भावे यांच्या स्मरणार्थ रविवारी २३ ऑगस्ट रोजी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समर्थ नगर येथील मारुती मंदिर तळी येथे या स्पर्धा होणार असून, विविध वयोगटांतील मुले व मुलींना जलतरण कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेत १२ वर्षांखालील, १४ वर्षांखालील, १६ वर्षांखालील, १८ वर्षांखालील तसेच खुल्या गटातील मुले व मुली सहभागी होऊ शकणार आहेत. प्रत्येक गटासाठी ५० मीटर व १०० मीटर फ्रीस्टाईल या प्रकारात स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर जलतरण क्रीडेला प्रोत्साहन देण्याबरोबरच नवोदित जलतरणपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांनी रविवारी सकाळी ८ वाजता स्पर्धास्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. स्पर्धेतील पंचांचा निर्णय अंतिम राहणार असून, स्पर्धेचे सर्व अधिकार व्यवस्थापनाकडे राहतील. विविध गटांतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
दरम्यान, पावसाच्या अभावी मारुती मंदिर तळीतील पाण्याची पातळी कमी राहिल्यास स्पर्धेच्या नियोजनात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहेत. अशा परिस्थितीत अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आयोजकांकडे राहतील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाकडून ५० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.
जलतरण स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ पर्यंत आयोजकांकडे आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नावनोंदणी व स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी अभय भावे (७५५९४८६६९९), उदय खडपे (७२१८१२०४२३), दीपक कोदलकर (७७६७८२३६७९) आणि महेश मयेकर (९४२२४२५७४०) यांच्याशी संपर्क साधावा.
या स्पर्धेला राजापूर तालुक्यातील जलतरणपटू, पालक व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि समर्थ नगर जलतरण क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.













