चिमुकल्या हातांनी बांधला देशप्रेमाचा धागा!

साळशी-सरमळेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून वीर जवानांसाठी अनोखी राखी 

देशप्रेमाची भावना रुजविणारा प्रेरणादायी उपक्रम

शिरगांव (प्रतिनिधी) :       रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा साळशी-सरमळेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांसाठी स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या तयार केल्या. या राख्या भावनिक पत्रांसह जवानांपर्यंत पाठविण्याचा देशप्रेमाने प्रेरित उपक्रम शाळेच्या वतीने राबविण्यात आला.

विद्यार्थ्यांनी विविध रंगांचे धागे, रंगीत मणी, चमकदार खडे, फुले आणि अन्य साहित्याचा वापर करून सुंदर राख्या तयार केल्या. राख्यांसोबत जवानांसाठी त्यांनी भावनिक पत्रेही लिहिली. “तुम्ही सीमेवर देशाचे रक्षण करता म्हणून आम्ही सुरक्षितपणे शाळेत शिकतो. तुमच्या शौर्याला आमचा मनापासून सलाम,” अशा भावना विद्यार्थ्यांनी पत्रातून व्यक्त केल्या.

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीम. आदिती रावले आणि मुख्याध्यापक श्री. समाधान रमेश कोळी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला. विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, कृतज्ञता, सामाजिक बांधिलकी आणि सर्जनशीलतेची भावना रुजविणे, तसेच देशरक्षणासाठी कार्यरत जवानांप्रती आदर व्यक्त करण्याची संधी देणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.

या उपक्रमाला पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. देवणेवाडी अंगणवाडी सेविका प्रतीक्षा शिवलकर, साळशी पोस्टमास्तर शिवानी नकाते आणि पोस्टमन लीना पुजारे यांनीही विशेष सहकार्य केले. पोस्ट विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या आणि पत्रे जवानांपर्यंत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली.

या उपक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ज्ञ श्री. राजेंद्र साटम आणि श्री. दिनेश सावंत यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या व पत्रांची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे आणि देशप्रेमाच्या भावनेचे कौतुक करत त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांनी तयार केलेली प्रत्येक राखी ही केवळ सजावटीची वस्तू नसून सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञतेचा संदेश घेऊन जाणारा धागा आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा अनुभव मिळाला.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, पालक, अंगणवाडी सेविका, पोस्ट विभागातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री. समाधान रमेश कोळी यांनी आभार मानले.