दोडामार्ग पंचायत समिती शिक्षण विभागाची आस्थापना मंजूर करून पदे भरा

आमदार दीपक केसरकर यांची ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे मागणी

​दोडामार्ग : दोडामार्ग पंचायत समितीमधील शिक्षण विभागातील आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत, यासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी मंगळवारी मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री नामदार योगेश कदम यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी दोडामार्ग तालुक्यातील शिक्षण विभागाच्या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधत रिक्त पदे भरण्याबाबत आग्रही मागणी केली.

​दोडामार्ग तालुक्याची निर्मिती होऊन अनेक वर्षे उलटून गेली तरीही तेथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला स्वतंत्र कर्मचारी आस्थापना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली नाही. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सुमारे ३१ तालुक्यांमध्ये हीच समस्या भेडसावत आहे. मात्र, कोकणातील भौगोलिक व सामाजिक परिस्थितीचा विचार करता दोडामार्ग तालुक्याचा ‘विशेष बाब’ म्हणून प्राधान्याने विचार करण्यात यावा, अशी आग्रही भूमिका आमदार केसरकर यांनी मांडली. दोडामार्ग शिक्षण विभागाला त्वरित स्वतंत्र कर्मचाऱ्यांची आस्थापना मंजूर करून ही रिक्त पदे तात्काळ भरण्याची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी राज्यमंत्र्यांकडे केली.

​यापूर्वीदेखील आमदार दीपक केसरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि आग्रही मागणीमुळे दोडामार्ग शिक्षण विभागासाठी शिक्षण विस्तार अधिकारी संवर्गाची दोन पदे मंजूर झाली आहेत. याच धर्तीवर आता इतर कर्मचारी पदेही लवकरात लवकर भरली जावीत, असा प्रयत्न सुरू आहे.

​आमदार केसरकर यांच्या मागणीची दखल घेत ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांनी या विषयावर वैयक्तिक लक्ष घालून लवकरात लवकर आस्थापना मंजूर केली जाईल, तसेच सर्व रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे सकारात्मक आश्वासन दिले. मंत्रालयात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण भेटीप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर हेदेखील उपस्थित होते.