सडुरे-शिराळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य : रस्ता तातडीने दुरुस्त करा 

सडुरेतील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद रावराणे यांचे बांधकाम विभागाला निवेदन 

वैभववाडी l प्रतिनिधी :वैभववाडी तालुक्यातील सडुरे व शिराळे गावांकडे जाणाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद रावराणे (सडुरे) यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी संबंधित विभागाला दिले आहे.

 

सांगुळवाडी फाटा ते निमअरुळे या रस्त्याचे सुमारे चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री सडक योजनेतून काम करण्यात आले होते. मात्र, काम झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्या वर्षापासूनच रस्त्याची अवस्था खालावण्यास सुरुवात झाली. सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.

 

या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाची असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रावराणे यांनी केला आहे.

 

सडुरे व शिराळे परिसरातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन संबंधित विभागाने रस्त्याची पाहणी करून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे आणि हा मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित व निर्धोक करावा, अशी मागणी रावराणे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.