रत्नागिरी : ऐकण्याबाबतची समस्या नेमकी काय आहे, याचा अभ्यास करून त्यानुसार उपचार करण्यासाठी तळकोकणातील पहिले ईझी ऑडिओ हिअरिंग क्लिनिक हे अद्ययावत ऑडिओलॉजी सेंटर रत्नागिरीत इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये सुरू झाले आहे.
या केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी केले. यावेळी ते म्हणाले, ऑडिओलॉजी या शास्त्राचे तपासणी केंद्र रत्नागिरी प्रथमच सुरू होत आहे. त्यासाठी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने उचललेले पाऊल लोकोपयोगी आहे. आजवर बघण्याची काळजी घेताना यापुढे ऐकण्याचीही काळजी या हॉस्पिटलमध्ये घेतली जाणार आहे. अनुजा धनंजय कुलकर्णी यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या या श्रवण सेवा केंद्राचा लाभ जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी घ्यावा.
यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. ठाकूर यांनी सांगितले की, ऑडिओलॉजी हे स्वतंत्र शास्त्र आहे. जसे डोळ्यांच्या आजाराकडे लोक दुर्लक्ष करतात, तसेच कानाबाबतही कमी ऐकू येणे यासारख्या समस्या टोकाला गेल्यानंतरच त्यावरील उपचाराची गरज लोकांना वाटते. अशा उपचारांसाठी मोठ्या शहरात जाणे अधिक खर्चीक असल्याने रुग्णांचा जुजबी उपचार करण्यावर भर असतो. लोकांना नीट बघता यावे म्हणून सुरू झालेल्या हॉस्पिटलने आता लोकांना नीट ऐकता यावे, यासाठी हे नवे दालन सुरू केले आहे. सर्व प्रकारच्या ऑडिओलॉजिक चाचण्या, मूल्यमापन, विविध कमी ऐकून येण्याच्या समस्यांवर उपाय करण्यासाठी हे केंद्र पूर्णपणे सुसज्ज आहे. ही सेवा इन्फिगोच्या रत्नागिरीसह खेड आणि लांजा येथील हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणार आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
ऑडिओलॉजिस्ट असलेल्या अनुजा धनंजय कुलकर्णी या रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कन्या आहेत. त्यांनी परदेशी न जाता आपल्याच देशात, गावात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करून सहाय्यक कर्मचाऱ्यांची तज्ज्ञ टीम रत्नागिरी जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. केवळ व्यवसायाचे नाही तर सेवेचे नवीन दालन उभे करून दिल्याचा अभिमान असल्याचे मत इन्फिगो आय केअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी व्यक्त केले.












