
संतोष कोत्रे l लांजा :- हसत खेळत , विज्ञान शिकूया शिबिर शाळा लांजा .५ मध्ये नुकतेच सपन्न झाले. शाळेतील इयत्ता चौथीच्या वर्गाच्या ५० मुलांनी कृतीशील सहभाग घेऊन विज्ञान खेळणी खेळण्याचा आनंद घेतला .
लहान वयातच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना व्हावी,त्यांच्यामध्ये विज्ञानाची अभिरुची वाढावी या हेतूने जि. प .शाळा लांजा नं .५ येथे विज्ञान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . घरातल्या घरात व परिसरात सहज मिळतील अशा वस्तू वापरून मुलांनी या शिबिरात वैज्ञानिक प्रयोग करून बघण्याचा अनुभव घेतला .
दि . १ ऑक्टोबर ते दि . ३ ऑक्टोबर या दरम्यान झालेल्या या शिबिरासाठी मार्गदर्शक म्हणून बालकवी, विज्ञानाच्या झरोक्यातून या मथळ्याअंतर्गत विज्ञानाचे सोप्या भाषेत लेखन करणारे विद्यालंकार घारपुरे , (जालगाव ) दापोली आणि सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या सदस्या तसेच सृजन उपक्रम केंद्राच्या सहसंचालक श्रीमती शिल्पा रेडीज , चिपळूण तसेच जि .प . शाळा लांजा नं ५ येथील नवनिर्मितीचा ध्यास घेणारे शिक्षक श्री. सुहास शिगम यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमांतर्गत विज्ञान गीत विज्ञान गोष्ट कथन , कृतियुक्त गीते, विविध प्रयोग यामध्ये पाण्यावर दिवा पेटवणे, वर वर चढणारा माणूस,उड्या मारणारी काडीपेटी,नाण्याची सर्कस, तारेचे स्प्रिंग खेळणे बनविणे,स्ट्रॉ व काड्या वापरून स्प्रिंकलर बनविणे,लिंबाने फुगा फुगविणे,पाण्याचा कारंजा, न फुटणारा फुगा , पाण्याचे कारंजे अशा प्रकारचे छोटे छोटे प्रयोग मुलांकडून प्रत्यक्ष करून घेण्यात आले…या प्रयोगासाठी लागणारे साहित्य सहज उपलब्ध होणारे, टाकाऊ वस्तूचा उपयोग होणारे,कमीत कमी किंमतीचे साहित्य ही या शिबिराचे वैशिष्ट्य होय..
मुलांनी प्रत्यक्ष प्रयोग करून बघणे , काही प्रयोग फक्त समजून घेणे व गटागटात प्रयोगांची चर्चा करणे , विज्ञान विषयक लेख वाचणे व सादरीकरण करणे , असे या शिबीराचे स्वरूप होते. सोबत मुलांच्या वयोगटांनुसार घेतलेल्या गाणी व विज्ञानाच्या गोष्टींचा आनंदही मुलांनी लुटला .
निरीक्षण , अनुमान , अनुभव व निष्कर्ष या चार मुख्य पायऱ्यांचा आधार घेऊन शिबिरातील बहुतांश कृती मुलांकडून करून घेण्यात आल्या. त्यामुळे व्यवहारातील प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे बघण्याच्या सवयीची गरज मुलांना लक्षात आणून देता आली . मुले खारे बटाटा वेफर्स खातात ,जेवताना वरून मीठ वापरतात , याचा प्रत्यक्ष परिणाम मुलांना प्रयोगाद्वारे समजावून दिला . त्यामुळे दोन्ही सवयी आरोग्यासाठी लाभदायक नसल्याचे मुलांनी मान्य केले .
तहानलेल्या कावळ्याच्या गोष्टीत माठाच्या तळाला असलेल्या पाण्याची पातळी दगडी खड्यांनी वरती येते , हे बघण्यासाठी जेव्हा प्रयोग केला , त्यावेळेला मुलांच्या लक्षात आले कि , मडके अर्धे भरलेले असले असते तरच खडे टाकल्यावर पाणी कावळ्याच्या चोचीपर्यंत आले असते . तळाला असलेले पाणी खडे टाकून अगदी मोजक्याच उंचीपर्यंत वर येऊ शकते , हे मुलांनी समजावून घेतले .
मुलांनी पौष्टिक पदार्थ खावेत या हेतूने सुकी भेळ , लिंबू सरबत , दडपे पोहे , कोशिंबीर व भाज्यांचे सॅलॅड बनवणे अशी कृती गटागटात करवून घेतली . त्यानंतर प्रत्येक खाद्यपदार्थांमध्ये असलेले घटक व त्यातील पोषणतत्वे मुलांनी माहीत करून घेतले.
शिबिराच्या तीन दिवसांत मुलांनी साधारण १० प्रयोग करून बघितले व तेवढेच प्रयोग समजावून घेतले . का ? कसे ? काय ? केव्हा ? किती ? या विषयाच्या लेखांचे वाचन केले . खेळाद्वारे स्थायू – द्रव – वायू या माध्यमातून उष्णतेच्या वहना सारख्या संकल्पना समजावून घेतल्या . या शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्ये असे की, समारोपाचा संपूर्ण कार्यक्रम ४थी च्या सहभागी मुलांनीच सादर केला . त्यात अगदी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष सुद्धा मुलेच बनली होती .
मुलांमध्ये तर्कसंगत विचारांची सवय रुजावी , यासाठी शिबिरातील मार्गदर्शक विद्यालंकार घारपुरे , शिल्पा रेडीज यांनी जाणीवपूर्वक प्रयोगांची आखणी केली होती .
या शिबिराचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ समृद्धी दीपक खडपे , शा. व्य. समितीचे अध्यक्ष .दिलीप चौगुले यांच्या हस्ते पाण्यावर दिवा पेटवून करण्यात आले . शिबिरप्रमुख म्हणून शिगम व माधुरी साळवी यांनी मेहनत घेतली..











