मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ; ‘Flying Konkan’च्या नव्या उपक्रमातून देवगड पर्यटनाला नवी दिशा
ऑनलाइन-ऑफलाइन मार्केटिंगवर भर; दर महिन्याला पर्यटकांना मिळणार नवा अनुभव
देवगड, ३० ऑगस्ट : देवगडच्या पर्यटन क्षेत्रात आणखी एका अभिनव उपक्रमाची भर पडली असून ‘Selfie Museum – Devgad’ या नव्या पर्यटन आकर्षणाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मंत्री तथा स्थानिक आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात झाले. ‘Flying Konkan LLP’च्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाची संकल्पना पर्यटकांना केवळ एखादे पर्यटनस्थळ पाहण्यापुरती मर्यादित न ठेवता, त्यांना फोटो, सोशल मीडिया आणि मनोरंजनाचा अनोखा अनुभव देण्याची आहे.
या प्रकल्पाची संकल्पना मांडणारे श्रीकांत जोईल यांनी सांगितले की, देवगडला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी देवगड किल्ला, समुद्रकिनारा, आंबा आणि निसर्ग यांसोबतच एक नवीन, आधुनिक आणि सोशल मीडिया फ्रेंडली अनुभव निर्माण करण्याचा ‘Flying Konkan’चा प्रयत्न आहे.
‘या प्रकल्पाची जास्तीत जास्त मार्केटिंग करा’ : नितेश राणे
‘Selfie Museum’च्या संकल्पनेची आणि त्यामागील पर्यटनविषयक उद्देशाची माहिती घेतल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी प्रकल्पाच्या व्यापक मार्केटिंगवर विशेष भर दिला. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून या उपक्रमाची प्रभावी प्रसिद्धी झाली पाहिजे. मोक्याच्या ठिकाणी प्रकल्पाची माहिती देणारे होर्डिंग्स उभारल्यास अधिकाधिक पर्यटक आणि नागरिकांपर्यंत ‘Selfie Museum’ची माहिती पोहोचेल आणि या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, असे मार्गदर्शन नितेश राणे यांनी केले.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रकल्पाच्या पुढील मार्केटिंगला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा ‘Flying Konkan’चा मानस आहे. सोशल मीडिया, डिजिटल प्रमोशन, पर्यटनस्थळांवरील प्रसिद्धी, स्थानिक तसेच प्रमुख मार्गांवरील होर्डिंग्स आणि विविध ऑफलाइन माध्यमांचा वापर करून ‘Selfie Museum’ची माहिती अधिकाधिक पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
दर महिन्याला नवा अनुभव
‘Selfie Museum’चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेले बॅकड्रॉप्स, थीम्स, प्रॉप्स आणि फोटोझोन वेळोवेळी बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना प्रत्येक भेटीत काहीतरी नवीन अनुभव घेता येणार आहे. अशा प्रकारचा हा देशातील एकमेव ‘Selfie Museum Experience’ असल्याचे सांगण्यात आले.
“आजच्या काळात पर्यटक एखाद्या ठिकाणी जाताना तेथील अनुभव आपल्या मोबाईलमध्ये टिपतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तो अनुभव हजारो लोकांपर्यंत पोहोचवतात. याच गोष्टीचा पर्यटनाच्या दृष्टीने सकारात्मक उपयोग करून देवगडला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे श्रीकांत जोईल यांनी सांगितले.
देवगड पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न
‘Flying Konkan’ यापूर्वी ‘Devgad Zipline’च्या माध्यमातून साहसी पर्यटनाला चालना देत आहे. आता ‘Selfie Museum’च्या माध्यमातून कुटुंब, युवा वर्ग, मुले, पर्यटक आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स यांच्यासाठी आणखी एक आकर्षण निर्माण करण्यात आले आहे.
या दोन्ही उपक्रमांमुळे देवगडमध्ये पर्यटकांचा मुक्काम वाढावा, स्थानिक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, दुकानदार, वाहतूक व्यवसाय तसेच इतर पर्यटनपूरक व्यवसायांना त्याचा फायदा व्हावा, असा ‘Flying Konkan’चा उद्देश आहे.
“देवगड हे केवळ आंब्यांसाठी किंवा समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखले जाऊ नये, तर निसर्ग, साहस, मनोरंजन आणि नवीन अनुभवांचे पर्यटनस्थळ म्हणून त्याची ओळख निर्माण व्हावी, ही ‘Flying Konkan’ची संकल्पना आहे,” असे श्रीकांत जोईल यांनी स्पष्ट केले.
स्थानिक रोजगार आणि पर्यटन व्यवसायाला संधी
या प्रकल्पामुळे थेट रोजगारासोबतच फोटोग्राफी, डिजिटल मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन, स्थानिक वाहतूक, खाद्यपदार्थ, हॉटेल्स आणि इतर पर्यटन व्यवसायांना अप्रत्यक्ष फायदा होण्याची अपेक्षा आहे.













