आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सातेरी देवी मंदिर परिसरातील नागरिकांना वीज समस्यातून दिलासा!

१५ लाख निधीतून विद्युत देऊळवाडा सातेरी मंदिर आडवण येथे ट्रान्सफॉर्मरची उभारणी 

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील देऊळवाडा परिसर ते सातेरी मंदिर आडवण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यासह वारंवार वीजखंडित होण्याच्या प्रश्न आता निकाली निघाला आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून १५ लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन माध्यमातून मंजूर होऊन नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर उभारणी करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते या ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

 

या कामासाठी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांचाही पाठपुरावा महत्वपूर्ण ठरला. या कामामुळे सातेरी मंदिर तसेच परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार निलेश राणे यांसह खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे यावेळी सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

 

नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक स्थिर आणि सुरळीत होण्यास मदत होणार असून, कमी दाबामुळे घरगुती विद्युत उपकरणांचे होणारे नुकसान तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार कमी होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः वादळी पावसाच्या काळात एकाच ट्रान्सफॉर्मरवर संपूर्ण परिसराचा भार असल्याने निर्माण होणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. या कामासाठी सुमारे १८ विद्युत पोल उभारण्यात आले असून, ट्रान्सफॉर्मरसाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या जमीनमालकांचेही महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे. त्यांच्या सहकार्याबद्दल यावेळी नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

 

लोकार्पण सोहळ्याला नगरसेविका नीना मुंबरकर, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, संदीप (बाबा) लुडबे यांच्यासह नागरिक समीर वर्दम, अर्जुन चव्हाण, मोहन आचरेकर, पराग चव्हाण, जितेंद्र मराळ, विश्वास परब, रुपाली आचरेकर, प्रमिला मराळ, जागृती मराळ, दीप्ती मराळ, अश्विनी मराळ, शीतल कदम, विजय तळगावकर, प्रमिला चव्हाण, संतोष मराळ, उदय वीर, बंटी आचरेकर, प्रमोद मराळ, सूर्यकांत फणसेकर, अशोक मराळ, शशीकांत यादव, ओंकार यादव, श्रद्धा तळवडेकर, गायत्री मराळ, गजानन मराळ यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

 

‘पाठपुराव्याला यश’

 

यावेळी मनोगत व्यक्त करताना नागरिक समीर वर्दम मयांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले. या ट्रान्सफॉर्मरसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. दीपक पाटकर यांच्या प्रयत्नातून जनहिताच्या दृष्टीने आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. दत्ता सामंत यांनीही या कामासाठी सहकार्य केले. त्यामुळे आज हे काम प्रत्यक्षात साकारले आहे. पूर्वी एकाच ट्रान्सफॉर्मरवर परिसराचा भार असल्याने वादळाच्या काळात ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यास संपूर्ण परिसर अंधारात जात होता. तसेच कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे फ्रिज, टीव्हीसह अन्य विद्युत उपकरणांवर परिणाम होत होता. आता नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी आमदार निलेश राणे, दीपक पाटकर, दत्ता सामंत तसेच जमीनमालकांचे त्यांनी आभार मानले.

 

अर्जुन चव्हाण यांनीही या कामाचे श्रेय आमदार निलेश राणे, दत्ता सामंत आणि दीपक पाटकर आणि सहकारी यांच्या पाठपुराव्याला दिले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हा ट्रान्सफॉर्मर प्रत्यक्षात उभा राहिला असून अन्य कोणीही या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी सांगितले.

 

तर शुभांगी मराळ म्हणाल्या परिसरातील कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता, अशी प्रतिक्रिया देत आमदार निलेश राणे यांच्याकडे करण्यात आलेली मागणी पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत आभार मानले.